लोणावळा -लोणावळ्यात पर्यटनासाठी येत असलेल्या पर्यटकाच्या डस्टर कारने जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्यात अचानक पेट घेतला. या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना व वाहनचालकांना या बर्निंग कारचा थरार पाहून अंगावर शहारे आले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, कार पूर्णतः जाळून खाक झाली.
गुरुवारी (दि. 2) दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास खंडाळ्यात एक्स्प्रेस हायवेच्या पुलाखाली ही घटना घडली. लाल रंगाची रेनॉल्ट डस्टर (क्र. एम. एच. 04, जी. जे. 0353) गाडी घेऊन मुंबईमधून लोणावळा येथे पर्यटनासाठी पाच जण निघाले होते. खोपोली येथे काही काळ थांबल्यानंतर ते खंडाळा बोर घाट चढून वर लोणावळ्याच्या दिशेने येत असताना खंडाळ्यात अचानक त्यांच्या गाडीच्या बोनेटमधून धूर निघू लागला. क्षणार्धात गाडीने पेट घेतला. मात्र, तत्पूर्वी गाडीतील पाचही जणांना गाडीतून सुखरूप बाहेर पडण्यात यश आले.
सदर घटनेची खबर मिळताच लोणावळा पोलीसचे पोलीस उप निरीक्षक लतीफ मुजावर, सहायक फौजदार सदाशिव पिरगणवार, पो. ना. मयूर अबनावे, पो. कर्मचारी स्वप्नील पाटील, पोलीस मदतनीस सतीश ओव्हाळ, दर्शन गुरव, तुषार घाडगे, विशाल दातीर, नितेश पडवळ यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. घटनास्थळी दाखल झालेल्या लोणावळा नगर परिषदेच्या तसेच आयआरबीच्या अग्निशमन दलाला पाऊण तासात ही आग विझविण्यात यश आले. दरम्यान या कालावधीत जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.