मानवंदनेसाठी दोन दिवस आधीच मुक्काम : परिसराला छावणीचे स्वरूप
वाघोली/ शिक्रापूर -एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे असलेल्या ऐतिहासिक विजय रणस्तंभ याठिकाणी मानवंदना देण्यासाठी देशभरातून अनेक भीम सैनिक येत असतात. शौर्य दिन जवळ आलेला असताना आता मानवंदना देण्यासाठी अनेक भीम सैनिक दोन दिवसाआधीच या ठिकाणी येत आहेत. त्याप्रमाणे अनेक भीम सैनिक कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ परिसरात दाखल झाले आहेत. पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा याठिकाणी दाखल झाला आहे. आता कोरेगाव भीमा परिसराला नव्याने छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी 2018 या शौर्य दिनी अचानक झालेल्या दंगलीमुळे आता जवळ आलेल्या शौर्य दिनाच्या एक जानेवारी कार्यक्रमाकडे पुन्हा देशाचे लक्ष लागले आहे. एक जानेवारी रोजी झालेल्या दंगलीमुळे मागील वर्षीपासून प्रशासन दोन महिन्यांपासून कार्यक्रमाचे नियोजन करीत आहे. कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, लोकप्रतिनिधींच्या अनेक बैठका होऊन याठिकाणी दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त, अनेक अग्निशमन बंब, रुग्णवाहिका, कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, दुर्बीण यांसह आदी अत्यावश्यक सुविधांची सोय याठिकाणी करण्यात
आली आहे.
आता एक जानेवारीच्या कार्यक्रमासाठी अनेक ठिकाणांहून भीम सैनिक कोरेगाव भीमा, पेरणे परिसरात दाखल झाले आहेत. आता आज रात्रीपासून पुणे- नगर रस्त्यावरील अवजड वाहतूक देखील बंद करण्यात येणार आहे. आता वाहतुकीत बदल झाल्यानंतर या रस्त्यावर काही ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने देखील बंदोबस्ताचा आढावा घेण्यात आला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दाखल झाला असल्यामुळे कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, पेरणे परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.