पुणे – महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडे वाड्यात सुरू केली. याच वाड्यात राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी महापालिकेस जवळपास 15 वर्षांचा लढा द्यावा लागला. अखेर या लढ्याला उच्च न्यायालयात यश आले असून, येथे भूसंपादन करण्यासाठी न्यायालयात असलेला दावा महापालिकेच्या बाजूने लागला आहे.
पुण्यात 227 बुधवार पेठ येथील ही ऐतिहासिक वास्तू आहे. भिडेवाडा ताब्यात घेऊन तेथे राष्ट्रीय स्मारक करावे, असा ठराव फ्रुेवारी 2006 मध्ये मुख्यसभेत केला. त्यानंतर जानेवारी 2008 मध्ये स्थायी समितीने त्यास मान्यता देऊन भूसंपादनाद्वारे ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. महापालिकेने सन 2011 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 327 चौरस मीटर जागेसाठी 1 कोटी 30 लाख रुपये मोबदला म्हणून ही रक्कम भूसंपादन विभागाकडे भरली. मात्र, ही जागा एका बॅंकेच्या ताब्यात असल्याने तसेच तिथे 24 भाडेकरू होते.
त्यांच्यातर्फे महापालिकेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यामध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली असल्याबाबत कोणताही सबळ पुरावा नसल्याने स्थायी समिती व मुख्य सभा ठराव रद्द करण्यात यावे. त्याअनुषंगाने कलम 4 व कलम 4 चे नोटीफिकेशन रद्द करण्यात यावे. तसेच पुणे महानगरपालिकेने जादा एफएसआय मान्य करावा. जेणेकरून टेरेसवर एक हॉल बांधता येईल, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. त्याबाबत सुनावणी सुरू असताना बॅंकेकडून मागील वर्षभरात जागा तडजोडीने देण्याची भूमिका घेत आजच्या रेडीरेकनरनुसार जवळपास 33 कोटींचा मोबदला मागण्यात आला.
तर महापालिकाही 21 कोटींसाठी तयार झालेली होती. मात्र, महापालिकेसह राज्य सरकारने भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली, हे पुराव्यानिशी मांडले आणि हा निकाल महापालिकेच्या बाजूने देण्याची विनंती केली. त्याला अखेर यश आले. आता महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर ही जागा त्वरीत तब्यात मिळेल, असा विश्वास महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी ऍड. निशा चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तर राज्यशासनाच्या 2023-24 च्या राज्याच्या अंदाजपत्रकात भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. दरम्यान, या दाव्यात राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनीही उच्च न्यायालयात महापालिका तसेच शासनाची भूमिका मांडली होती.
ही वास्तू महिलांसाठी प्रेरणास्थान आहे. भावी पिढीनेदेखील त्यातून सामाजिक कार्याची आणि शिक्षणाची प्रेरणा घ्यावी, यासाठी राष्ट्रीय स्मारक म्हणून वाड्याचा विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याला न्यायालयाच्या निकालाने यश आले आहे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
राज्यासह पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. मुलींची पहिली शाळा म्हणजे भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. आता लवकरच या स्मारकाच्या कामाला गती मिळणार आहे. – चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री