काळेवाडी – रहाटणी येथील शिवार चौकात वाहतुकीच्या नियमांना हारताळ फासत वाहतूक सुरू आहे. याकडे वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे दुर्लक्ष होत असल्याने बेशिस्त वाहनचालकांचे फावत आहे. शिवार चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले आहेत. परंतु याकडे वाहनचालक दुर्लक्ष करत वाहने दामटीत असतात. त्यामुळे चौकात दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. तरी वाहतूक नियंत्रित करणाऱ्या पोलिसांनी येथील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
शिवार चौक वाकड-नाशिक फाटा बीआरटी मार्गावर आहे. या चौकात कायमस्वरुपी वाहनांची मोठी वर्दळ असते. रहाटणी व पिंपळे सौदागर मधील कुणाल आयकॉन रस्त्याला हा चौक जोडतो. ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले, सायकलस्वार येथून ये-जा करतात. मात्र, बहुदा वाहतुकीचे नियमच येथे पाळले जात नाहीत. बीआरटीसाठी हिरवा दिवा लागला की वाहनचालक सुसाट सुटतात. सिग्नल सुटण्याची वाट पाहत न थांबता बेशिस्त वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येऊन थांबतात. अशा वेळी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे मोठे जिकीरीचे होऊन जाते.
झेब्रा क्रॉसिंग गायब
रस्त्याने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी झेब्रा क्रॉसिंग आहे. परंतु शहरातील बहुतांश चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग गायब झाले आहे. तर ज्या ठिकाणी तेथे वाहनचालक गाड्या आणून उभा करत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत आहे. शिवार चौकातील झेब्रा क्रॉसिंगची मार्कींग पुन्हा नव्याने तयार करावी.
शहरातील बहुतांश चौकांमधून ज्येष्ठ नागरिक, पादचाऱ्यांना ये-जा कठीण झाले आहे. कोकणे चौक, शिवार चौकात झेबा क्रॉसिंग तर फक्त नावालाच आहे. त्यावर वाहनचालक अतिक्रमण करत आहेत. परंतु चौकातील सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे बेशिस्तपणे वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी.
– स्थानिक नागरिक.