अवैध मुरूम उपशामुळे बंदिस्त विद्युत वाहिनी ब्रेक : वीजपुरवठा खंडित
शिंदे वासुली – चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील भांबोली हद्दीतील हंट्समन कंपनीने जवळ मुख्य रस्त्यालगत असलेल्या बंदिस्त विद्यूत वाहिनी केबल एका अवैध मुरुम उत्खननामुळे ब्रेक होऊन वीज प्रवाह खंडित झाला. त्यामुळे शिंदे, वासुली, भांबोली, वराळे, सावरदरी गावांची घरगुती व येथील छोटे-मोठे व्यावसायिकांचा वीजपुरवठा गायब झाली. दिवसभरात विद्यूत वाहिनी केबल दुरुस्त न झाल्याने अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काही कंपन्यांचे काम दिवसभर ठप्प होते. त्यामुळे कामगार बसून होते.
हंट्समन कंपनी जवळील रस्त्यालगत सोमवारी (दि. 17) मुरूम उत्खनन करताना मशिनमुळे दोन विद्यूत केबल ब्रेक झाल्या. दरमयान, एमआयडीसीमुळे विद्युत मंडळाच्या कर्मचारी, अधिकारी, वायरमन व लाइनमन यांच्या कामाचा व्याप वाढला आहे.
दिवसभर व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना विद्युत वाहिनी ब्रेक झालेल्या घटना वेळेवर कळवल्या जात नाही. त्यामुळे अशा घटनेची माहिती उशीरा मिळते. मग त्यानंतर विद्युत वाहिनी कुठे ब्रेक झाली, खंडित झाली हे शोधावे लागते. आणि वेळेवर विद्युत प्रवाह सुरळीत झाला नाही तर त्यांना नागरिक व व्यावसायिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
मंगळवारचा प्रकार त्यांना उशीरा समजला. पहिला तो शोधण्यातच दोन चार तास गेले. आणि वाहिनी दुरुस्त करुन रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाला. तोपर्यंत कित्येकांचे आर्थिक नुकसान झाले होते.
या घटनेची महावितरण कंपनीने गंभीर दखल घेतली असून विद्युत प्रवाह खंडित होण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे फिर्याद दाखल करणार असून नुकसानभरपाई वसुल करणार आहे.
– राहुल डेरे, उपकार्यकारी अभियंता, चाकण, महावितरण