सकाळी 9 पर्यंत नाश्ता, तर अकरापर्यंत जेवण देण्याचे आदेश
नगर – अंगणवाडीतील बालकांना सकाळी 9 पर्यत नाश्ता,तर अकरा वाजेपर्यंत जेवण मिळालेच पाहिजे.तसेच अंगणवाडी केंद्रांमध्ये स्वच्छता राखण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मिराताई शेटे यांनी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती मिराताई शेटे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.18 झाली. यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना गरम ताजा आहार तसेच सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना तसेच गरोदर स्तनदा मातांना घरपोहोच आहार पुरविण्यासाठी जिल्हा स्तरावरून इ-निविदा प्रसिध्द करण्यात येवून संस्थांची निवड करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे.
यामध्ये घरपोहोच आहारासाठी सहा संस्थांची निवड झालेली असून गरम ताजा आहार पुरविण्यासाठी 39 बचत गटांची निवड करण्यात आली आहे. पात्र झालेल्या या संस्थांना त्वरित पुरवठा आदेश देण्याबाबत सूचना समिती सभेमध्ये देण्यात आल्या. तसेच बाल विकास योजनेतंर्गत अंगणवाडी केंद्रासाठी नळ कनेक्शन घेण्यासाठी 80 अंगणवाड्यांना प्रत्येकी दहा हजार रूपये प्रमाणे तसेच अंगणवाड्यांना निधी प्राप्त झालेला असून सदर निधी तातडीने खर्च करण्याबाबतचे आदेश यावेळी देण्यात आले. तसेच 435 लेडीज सायकल लाभार्थ्यांच्या पात्र यादीस मान्यता देवून सदर रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या.