लोणंद – लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगरावर काल रात्री लावण्यात आलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे व वन्यप्राण्यांचे नुकसान झाले. सुमारे दोन-तीन भडकलेला वणवा लोणंद व मरिआईचीवाडी येथील युवकांनी जीवाची बाजी लावत रात्रीच्या अंधारात खडतर परिश्रमांनी विझविण्यात यश मिळविले.
डोंगराच्या उत्तर, पश्चिम, दक्षिण बाजला वणव्याने वेढा दिला होता. सुदैवाने डोंगर ग्रुपने लावलेल्या झाडांना या वणव्यात झळ लागली नसली तरी अन्य छोटी-मोठी झाडे आगीच्या भक्षस्थानी पडली. त्यामुळे हिरवागार, राखाडी दिसणारा भैरोबाचा डोंगर आता काळा दिसू लागला आहे. डोंगरावर वारंवार वणवा लावणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.
लोणंद – शिरवळ मार्गावर लोणंद शहरापासुन दोन किलोमिटर अंतरावर एमआयडीसी जवळ असणाऱ्या भैरवनाथ डोंगराला गेल्या काही दिवसापासुन वारंवार वणवा लावण्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे डोंगरावरील वनसंपदा व प्राणी, पक्षांची मोठी हानी होत आहे.
गुरुवारी रात्री अशाच प्रकारचा डोंगराच्या पश्चिम बाजुकडुन वणवा लागला बघता बघता वणव्याने पश्चिम बरोबरच दक्षिण व उत्तर बाजुकडे वणवा सरकला जाऊन त्याची दाहकता वाढली गेली. मरिआईचीवाडीतील जागरूक तरूणांनी डोंगर ग्रुपच्या सदस्यांना फोन वरून वणव्याची माहिती देताच लोणंद व मरिआईचीवाडी येथील युवकांनी वणवा विझविण्यासाठी धाव घेतली. या युवकांनी मोठया धाडसाने झाडांच्या फांदया , बारदाना, फॉगींग मशीनच्या सहाय्याने जमेल तसे रात्रीच्या अंधारात वणवा विझण्यासाठी धडपड सुरू केली सुमारे दोन तासानंतर वणवा विझविण्यात यश आले.
या वणव्याने डोंगरावर असणारी लहान मोठी झाडे यांना मोठी झळ पोहचुन नुकसान झाले तर जंगली प्राणी यांनाही त्याचा फटका बसला गेला. सुदैवाने डोंगर ग्रुपने लावलेल्या सुमारे पन्नास झाडांना वणव्याची झळ बसली नाही पण काही दिवसापुर्वीच्या वणव्याचा फटका लावलेल्या सुमारे दहा झाडांना बसला होता. युवकांनी डोंगरावर धाव घेऊन या झाडांच्या बाजुचे गवत रात्रीच्या अंधारात मोबाईल बॅटरीच्या उजेडात काढुन झाडे सुरक्षीत ठेवण्यात यश मिळविले.
वणवा विझविण्यासाठी डोंगर ग्रुप सदस्य, वनकर्मचारी विश्वास मिसाळ, लोणंद व मरिआईचीवाडी येथील युवकांनी तत्परता दाखऊन परिश्रम घेत आजची तरूणाई सामाजीक कार्यात मागे नसल्याचे दाखवून दिले. डोंगराला वारंवार वणवा लावणाऱ्या विरोधात ठोस कारवाईची भुमिका घ्यावी अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.