पिंपरी-चिंचवड महापालिकेला आर्थिक दिलासा
बॅंक ऑफ बडोदा बॅंकेत रक्कम जमा
पिंपरी (प्रतिनिधी) – आर्थिक निर्बंधांमुळे खासगी क्षेत्रातील “येस’ बॅंकेत अडकलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 984 कोटी 26 लाख रुपये गुरुवारी (दि. 19) रात्री अखेर परत मिळाले आहेत. गुरुवारी उशिरा महापालिकेला पैसे मिळाले असून, राष्ट्रीयकृत असलेल्या पिंपरीतील बॅंक ऑफ बडोदामध्ये पैसे जमा केले आहेत. 15 दिवसांनी महापालिकेला पैसे मिळाले आहेत. त्यामुळे महापालिकेला आर्थिक दिलासा मिळाला आहे.
येस बॅंकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याने भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बॅंकवर 5 मार्च रोजी निर्बंध लागू केले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दैनंदिन कररूपी गोळा झालेले तब्बल 984 कोटी 26 लाख रुपये बॅंकेत अडकले होते. त्यामुळे महापालिकेला आर्थिक झटका बसला होता. मागील दोन वर्षांपासून “येस’ बॅंकेशी व्यवहार केला होता. महापालिकेचा दैनंदिन जमा होणारा भरणा “येस’ बॅंकेत जमा होत होता.
या महसुलाचा वापर शहर विकास, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी केला जातो. ठेकेदारांना मोबदला दिला जातो. तो मार्च 2020 पूर्वी देणे क्रमप्राप्त आहे. बॅंकेत पैसे अडकल्याने महापालिकेच्या “कॅश फ्लो’वरही परिणाम झाला होता. त्यासाठी येस बॅंकेत अडकलेले महापालिकेचे 984.26 कोटी तातडीने अदा करावेत, अशी विनंती प्रशासनाने केली होती. आरबीआयने दोन दिवसांपूर्वी “येस’ बॅंकेवरील निर्बंध उठविल्याने बॅंकेचे कामकाज सुरळीत झाले होते. त्यानंतर गुरुवारी (दि. 19) रात्री महापालिकेचे “येस’ बॅंकेत अडकलेले 984 कोटी 26 लाख रुपये परत मिळाले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे “येस’ बॅंकेत अडकलेले 984 कोटी 26 लाख रुपये परत मिळाले आहेत. गुरुवारी (दि. 19) रात्री पैसे मिळाले. राष्ट्रीयकृत असलेल्या पिंपरी शाखेतील बॅंक ऑफ बडोदामध्ये पैसे जमा केले आहेत. महापालिकेचे सर्व व्यवहार बॅंक ऑफ बडोदामधून होत आहे. दैनंदिन भरणा याच बॅंकेत केला जात आहे. तर यापुढे राष्ट्रीयकृत बॅंकामध्ये पैसे ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही स्पष्ट केले आहे.
– जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका.