नवी दिल्ली – तुमचे शिक्षण काही असो किंवा नसो; पण तुमच्या प्रत्येकामध्ये एखादा असा खास गुण असतो, ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे काही साकारु शकता आणि जगाचे लक्ष वेधून घेऊ शकता.
अगदी अशीच कमाल आसाममधल्या एका 62 वर्षीय महिलेने केली आहे. या महिलेने रेशमी अर्थात सिल्कच्या (silk) कापडावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली श्री भगवद्गीता (Bhagavad Gita) हातमागाच्या सहाय्याने साकारली आहे.
या कमाल कामगिरी केलेल्या महिलेचे नाव हेमप्रभा असून ती जोरहाटची राहणारी आहे. हेमप्रभा यांना लहानपणापासूनच भरतकाम, वीणकामाची आवड होती. त्यामधून त्यांनी त्यांच्या छंदाला व्यवसायाचे रूप दिले होते.
तरिही आपण काहीतरी लक्षणीय आणि वेगळे असे काम करावे, ही त्यांची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच सिल्कच्या अत्यंत तलम कापडावर श्री भगवद्गीता साकार करण्याची कल्पना त्यांना सुचली. गीतेचे सर्वच्या सर्व 700 श्लोक हेमप्रभा यांनी सिल्कच्या कापडावर साकारले.
संस्कृत, इंग्रजी आणि आसामी भाषांमध्ये श्री भगवद्गीतेचे श्लोक कापडावर दिसतात. त्यांनी 2 वर्षात 250 फूट लांब कापडावर संस्कृतमध्ये श्री भगवद्गीता तयार केली. यानंतर त्यांनी आसामी आणि इंग्रजी भाषेत भगवद्गीतेचे श्लोकही कापडावर विणले.
मात्र, इंग्रजी वाचता येत नसूनही त्यांनी हे श्लोक एखाद्या चित्राप्रमाणे सिल्कवर साकारले. भगवद्गीता सिल्कवर साकारतानाचा व्हिडीओ समाज माध्यमांत लोकप्रिय झाला असून, हेमप्रभा यांच्या या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे, असे अनेकांनी म्हटले आहे.