नवी दिल्ली – “मिस्टर इंडिया’, “लखन’, “मजनूभाई’, “नायक’ वा “एके’ सारखी पात्रे, “झकास’सारखे संवाद आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या स्टाइलचा त्यांच्या परवानगीशिवाय व्यावसायिक उपयोग करता येणार नाही, असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने (High Court) दिला आहे.
सोशल मीडियावरील दुरुपयोग रोखण्यासाठी अनिल कपूर (Anil Kapoor) न्यायालयात गेले होते. समाजमाध्यमांवरील प्रकारांमुळे आपली प्रतिमा मलिन होत असल्याचेही कपूर यांनी याचिकेत म्हटले होते.
दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय देताना, सोशल मीडिया आणि संबंधित संकेतस्थळांवर ही नावे, संवाद, व्हिडिओ वा आवाजाचा उपयोग अनिल कपूर यांच्या अनुमतीशिवाय करता येणार नाही, असे म्हटले आहे.
न्यायाधिश प्रथिबा एम सिंह यांनी म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल शंका असण्याचे कारण नाही. मात्र निश्चित सीमेचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडित अधिकारांना धोका निर्माण होत असल्यास ते असंवैधानिक ठरते.
एखाद्या व्यक्तीचे नाव, आवाज, संवाद आणि प्रतिमेच्या अवैध पद्धतीने व्यावसायिक उद्देशाने वापराची परवानगी देता येणार नाही. एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा दुरुपयोग न्यायालय डोळे मिटून सहन करू शकत नाही. त्यामुळे अशांना अभिनेत्याचे नाव व त्यांच्या वैशिष्ट्यांचा वापर करण्यापासून रोखणे आवश्यक आहे.
न्यायालयाने पुढे म्हटले की, अनिल कपूर यांचे नाव, आवाज, प्रतिमा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या इतर गोष्टी ही त्यांची प्रतिष्ठा आहे. एखादा तिसरा पक्ष त्यांच्या व्यक्तिमत्त्व अधिकारांचा वापर करत असेल तर सर्वसामान्य लोकांत त्यांच्याबाबत गैरसमज निर्माण होऊ शकतो.
त्यातून त्यांचे नुकसानही होऊ शकते, हे या प्रकरणावरून दिसते. खासगीपणा हा कलाकारांचा अधिकार आहे. स्वत:ची प्रतिमा, आवाज वाईट पद्धतीने चित्रित व्हावा, असे त्यांनाही वाटत नाही.
अभिनेत्याची प्रतिमा इतर अभिनेत्यांशी जोडणे हे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतर तिसऱ्या अभिनेत्यांसाठीही अपमानजनक आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने पुढे केली आहे.