न्यूयॉर्क : गेल्या तीन वर्षांमध्ये संपूर्ण जगाने करोनासारख्या साथीच्या रोगाची लाट पाहिली. या रोगापासून बचावासाठी जगभरातील सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले. २०१९ पासून सुरू झालेला हा रोग आता कुठे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. परंतु करोनाची लाट ओसरल्यानतंतर आणि यावर लस तयार झाल्यानंतर परिस्थिती सुरळीत झाली आहे असं आपल्याला वाटत असलं तरी वैज्ञानिक पुढच्या संकटामुळे चिंतेत आहेत. कारण करोना पेक्षाही भयंकर साथीच्या रोगाची चिंता सध्या जागतिक आरोग्य यंत्रणेला सतावत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी अलिकडेच केलेले एक वक्तव्य जगाच्या चिंता वाढवणारे आहे, तसेच वैज्ञानिकांना अधिक सतर्क करणारे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी जगाला येणाऱ्या साथरोगासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. त्यांच्या मते हा रोग करोनापेक्षा महाभयंकर आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रायोरिटी डिसीज नावाने एक रोगांची यादी आहे. यामध्ये प्राणघातक साधीच्या रोगांचा समावेश आहे. या यादीत इबोला, सार्स आणि झिका यांसारख्या आपल्याला परिचित असलेल्या रोगांची नावं आहेत. त्यात आता डिसीज एक्स हे नाव समाविष्ट करण्यात आलं आहे.
सध्या या आजाराची ओळख पटलेली नाही, म्हणून आरोग्य संघटनेनं या आजाराला एक्स असे नाव दिले आहे. याची ओळख पटली नसली तरी यामुळे मानवांमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका आहे. डिसीज एक्स हा ज्या प्रकारचा रोग आहे ज्यावर लसी किंवा उपचारांचा अभाव दिसून येतो.