नगर -35 फोटो प्रो या प्रोफेशनल फोटोग्राफी कंम्युनिटी, रशिया यांनी नुकतीच आयोजित केलेल्या “35 अवॉर्डस’ या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्ये अहमदनगरच्या ओंकार रवींद्र बेद्रे यांचा जागतिक स्तरावरील पहिल्या 100 सर्वश्रेष्ठ वन्यजीव छायाचित्रकारामध्ये समावेश झालेला आहे.
त्याचप्रमाणे ओंकारने काढलेल्या छायाचित्राचा समावेश पहिल्या सर्वश्रेष्ठ 50 छायाचित्रामध्ये झालेला आहे.
या स्पर्धेमध्ये 173 देशातील 1 लाख 17 हजार 541 छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. एकूण 4 लाख 18 हजार छायाचित्र स्पर्धेसाठी आले. स्पर्धेचे परीक्षण जगातील 50 देशातील 50 नामांकित छायाचित्रकारांनी केले आहे.
या स्पर्धेमध्ये ओंकार यांनी काढलेल्या सुर्यास्ताच्या वेळी उभा असलेला काळवीटचा छायाचित्र जागतिक स्तरावर पहिल्या 50 छायाचित्रामध्ये समावेश झालेला आहे. या स्पर्धेमध्ये सर्वश्रेष्ठ 100 छायाचित्रे व सर्वश्रेष्ठ 100 छायाचित्रकारामध्ये भारतातील फक्त 10 छायाचित्रकारांचा समावेश असून त्यापैकी एक ओंकार बेद्रे आहेत. ओंकारने मिळविलेल्या यशामुळे अहमदनगरचं नाव जागतिक पातळीवर गेले आहे. ओंकार याने वयाच्या वीसाव्या वर्षी मिळविलेल्या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरामधून त्याचे अभिनंदन होत आहे.