पाथर्डी – भारतात तसेच महाराष्ट्रात करोनाचा विळखा घट्ट बसत असून ग्रामीण भागातही करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. करोना योद्धे म्हणून डॉक्टर तसेच परिचारिका रात्रंदिवस सेवा पुरवत असले तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे पाथर्डीसारख्या ग्रामीण भागात रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या भौतिक सुविधा कमी पडत आहेत.
ही बाब लक्षात आल्यानंतर येथील अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोव्हीड सेंटरला 11 अद्यावत बेड देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या बेड उपजिल्हा रुग्णालयास देण्यात आल्या. प्रतिष्ठानने संपूर्ण लॉकडाऊन च्या काळात शहरातील गरीब मजूर व हातावर पोट भरणाऱ्या 700 पेक्षा जास्त कुटुंबाना किराणा व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची भूक भागविण्याचे काम केले.
अभय आव्हाड प्रतिष्ठान तसेच बाबूजी आव्हाड महाविद्यालय कर्मचाऱ्यांच्या वतीने पंतप्रधान साहाय्यता व मुख्यमंत्री साहाय्यता निधीस दोन लाख रुपयांची मदत करण्यात आली. कोव्हीड सेंटरला देण्यात आलेल्या बेड भेटप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बबन चौरे, खजिनदार दादासाहेब वाघ, संजय बडे आदी उपस्थित होते.