जळगाव : देशात एकीकडे केंद्र सरकार ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा नारा देत आहे तर दुसरीकडे घरात मुलगी झाली म्हणून तिचा तिरस्कार करण्याचा, तिला कुठे तरी कचऱ्यात टाकण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. अशीच एक जळगावमधील घटना समोर आली असून त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. दोन मुलींच्यानंतर तिसरीही मुलगीच झाल्याने जन्मदात्या बापाने आपल्या आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केल्याची खबळजनक घटना उघडकीस आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हरिनगर तांडा याठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. हत्या करणाऱ्या पित्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. हरिनगर तांडा या ठिकाणी राहत असलेल्या गोकुळ गोटिराम जाधव या व्यक्तीस अगोदर दोन मुली होत्या, त्यानंतर तिसरं अपत्य देखील मुलगीच झाल्यानं गोकुळ जाधव यांना राग अनावर होऊन त्याने आपल्या आठ दिवसांच्या चिमुकलीच्या तोंडात तंबाखू कोंबली आणि तिला तसेच पाळण्याच झोपवले. तंबाखूच्या विषाने आठ दिवसांच्या या चिमुरडीने काही वेळातच प्राण सोडला.
सकाळी उठल्यानंतर याच नराधम बापाने चिमुकली आजारी असल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा कांगावा केला. आरोपी पित्यानं जवळच्याच परिसरात पोटच्या चिमुकलीवर अंत्यसंस्कार केले. या सर्व प्रकाराची माहिती त्या परिसरातील आशा सेविकांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठांना यासंदर्भात माहिती दिली होती. वरिष्ठांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधत संपूर्ण प्रकार कानावर घातला, तसेच, अनेक शंकाही उपस्थित केल्या. पोलिसांनी सर्व प्रकरण जाणून घेऊन तात्काळ आपली सूत्र हलवण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपली सूत्र हलवण्यास सुरुवात केली. सदर प्रकरणाचा पोलिसांनी गोपनिय तपास सुरू केला. आरोपी गोटीराम जाधव यानंच हा खुनाचा धक्कादायक प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं, पोलिसांनी त्यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. तसेच, पोलिसांनी तात्काळ नराधम बापाला अटक केली.