रामचंद्र सोनवणे
राजगुरुमनगर – शेतात काम करणाऱ्या ६५ वर्षीय महिला शेतकऱ्याच्या तोंडात बोळा कोंबून मारहाण करून तिच्या गळ्यातील, कानातील तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने शिकवणाऱ्या २ चोरट्यांपैकी एकाला तीन गावाच्या युवकांनी व ग्रामस्थानी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही घटना वाजवणे ता खेड येथे सोमवारी (दि. ३) रोजी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली.
या गुन्ह्याची पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, वाजवणे ता खेड या गावातील ६५ वर्षीय जनाबाई धोंडीभाऊ आंद्रे या सोमवारी (दि.३) गावाजवळील साकुर्डी फाटयाचे जवळ असलेले इनाम नावाचे त्यांच्या मालकीच्या शेतात दुपारीपासून काम करीत होत्या. त्या काम करीत असताना सव्वाचार वाजण्याच्या सुमारास गोरक्षनाथ भगवान पिंगळे रा. वडगाव फाटा, वडगाव काशिंबे, ता आंबेगाव जि पुणे, देशराज दिलीप होले रा. ठाकूर पिंपरी, ता खेड जि पुणे तेथे आले.
जनाबाई धोंडीभाऊ आंद्रे या शेतात एकट्याच काम करीत असल्याने रस्ता विचारण्याच्या बहाणा करून तिच्या जवळ आले. जनाबाई आंद्रे हिला दोघांनी खाली पाडले आरडा ओरडा करू नये म्हणून या चोरटयांनी जनाबाईच्या डोक्याला बांधलेले स्कार्प काढून ते तिच्या तोंडात कोंबले. तिचे छातीवर लाथ मारून चेह-यावर, गळयावर, छातीवर हाताने ओरबाडून तिस जखमी केले.
जनाबाई आंद्रे हिच्या अंगावरील१ लाख २५ हजार रुपये किमतीचेे एक सोन्याचे मणीमंगळसुत्र त्यामध्ये २ मोठया वाटया, ४ मोठे मणी व
लहान ८० मणी असे दोन पदरी असलेले (वजन अडीज तोळे), १ लाख ५० हजार रूपये किमतीचेे एक सोन्याचे डोरले त्यामध्ये एक मोठे डोरले, ४ मोठे मणी व लहान ८० मणी असे चार पदरी असलेले (वजन तीन तोळे), २५ हजार रुपये किमतीची एक सोन्याची कुडी (वजन अर्धा तोळे) असा ३ लाख रुपयांचा ऐवज चोरटयांनी ओरबाडून पळून गेले.
मारहाण करून सोन्याचे दागिने ओरबाडून नेल्यानंतर लगेचच त्यांनी आरडाओरडा केला. जवळपासच्या शेतात असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जनाबाई यांचे पुतणे माजी सरपंच चंद्रकांत आंद्रे जवळच होते त्यांनी तत्काळ गावातील युवकांना फोनवर माहिती दिली. चोरटे त्यांच्या एमएच १४ एचएस ६६१२ या दुचाकीवरून पळून जात असताना गावातील तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांना चकवा देत ते औदर गावाच्या बाजूकडे पळून गेले.औदर गावातील तरुणांना फोन वरून ग्रामस्थांनी माहिती दिली. औदर गावात त्यांना अडविण्याचा प्रयत्न झाला मात्र ते भरधाव वेगात होते त्यांनी गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. पुढे ते देवोशी गावाच्या दिशेने पळून जात होते.
मात्र देवोशी गावातील तरुणांना माहिती मिळाल्याने त्यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. रस्ता एकच असल्याने ते पुन्हा मागे फिरले. औदर आणि देवोशी दोन्ही गावाकडून मोठ्या संख्येने तरुण ग्रामस्थ येत असल्याने त्यांनी गाडी जाग्यावर सोडून शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गावातील तरुणांनी दोघांपैकी एकाला पकडले. भरपूर चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले. यात एक सराईत चोरटा दागिने घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.
जनाबाई आंद्रे याचा मुलगा अरुण धोंडिभाऊ आंद्रे यांनी खेड पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोरक्षनाथ भगवान पिंगळे रा. वडगाव फाटा, वडगाव काशिंबे, ता आंबेगाव जि पुणे, देशराज दिलीप होले रा. ठाकूर पिंपरी, ता खेड जि पुणे यांच्या विरोधात भादंवि ३९४, ३४ अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काबुगडे करीत आहेत.या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली असून महिलावर्गात भीती जन्य वातावरण पसरले आहे.