नवी दिल्ली – देशात करोना लसीकरण सुरू झाल्यापासून गोंधळाची परिस्थितीही उद्भवत आहे. करोना लशीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. सध्या देशात दोन करोना लसींचे डोस दिले जात आहेत. पण एका व्यक्तीने एकाच लसीचे दोन डोस घ्यावे, असा सल्ला दिला जातो आहे.
यातच प्रोटोकॉलनुसार एकाच लसीचे दोन डोस द्यायला हवेत. जर क्वचित एखाद्या प्रकरणी एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या करोना लसीचे डोस दिले गेले असले तरी चिंता करण्याचे कारण नाही. ते सुरक्षित आहे. आपण “मिक्स अँड मॅच’ करोना लसीच्या ट्रायलबाबतही विचार करत आहोत, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
मात्र या लसीचे डोस घेण्यावरून अनेकांच्या मनात अनेक प्रश्न घोंगावत आहे. काही देशांमध्ये ‘मिक्स अँड मॅच’ कोरोना लसीचा डोस देण्याचा प्रयोग सुरू आहे. तसेच अनेक वैज्ञानिकांनी मिक्स अँड मॅच लसीचे डोस सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. पण आता जागतिक आरोग्य संघटनेने मिक्स अँड मॅच लसीचे डोस धोकादायक ठरू शकतात, असा इशारा दिलाय. कोरोना लसीचे मिक्स डोस घेऊ नका, हे धोकादायक ठरू शकते, असा इशारा WHOच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे.
डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले आहे की,आतापर्यंत ‘मिक्स अँड मॅच’ कोरोना लसीचा डोस याविषयी कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. वेळेत लसीचे डोस घेणेही खूप आवश्यक आहे. यातच जर प्रत्येक देशाने आपल्या मर्जीनुसार लसीचे डोस घेतले तर समस्या निर्माण होऊ शकते, असंही स्वामीनाथन म्हणाल्या. यामुळे साईड इफ्फेक्ट होऊ शकते.
त्या पुढे म्हणाल्या, ‘दोन वेगवेगळ्या लसींचे डोस कोणत्याही परिस्थितीत एकत्र मिसळले जाऊ नयेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.’