अलूर :- भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली व बीसीसीआय यांच्यात पुन्हा एकदा खटका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आशिया करंडक स्पर्धेपूर्वी खेळाडूंच्या तंदुरुस्तीची अद्ययावत चाचणी मानली जात असलेल्या योयो चाचणीचा निकाल विनापरवानगी जाहीर केल्यामुळे कोहलीवर बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे.
योयो चाचणीत आपल्याला 17.2 गुण मिळाल्याचे त्याने जाहीर केले व लगेचच बीसीसीआयने कोहलीला यापुढे कोणतीही गोपनीय माहिती उघड न करण्याचे आदेश दिले आहेत. कोहलीने आपला चाचणीदरम्यानचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केल्यामुळेही बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे.
कोहलीने हा फोटो व माहिती शेअर केल्यावर काही क्षणातच भारतीय संघ व्यवस्थापनाने सर्व भारतीय क्रिकेटपटूंसाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनीही खेळाडूंना त्यांचे योयो चाचणीचे गुण, जे गोपनीय माहितीच्या अंतर्गत येतात ते जाहीर करण्यास मनाई केली आहे.
अलूर, बंगळुरू येथील तंदुरुस्ती व सराव शिबिरात सहभगी झालेल्या भारतीय संघातील सर्व क्रिकेटपटूंना आशिया करंडक स्पर्धेपूर्वी तोंडी मार्गदर्शन करण्यात आले होते. तरीही कोहलीने योयो चाचणी 17.2 गुणांसह उत्तीर्ण केल्याचे जाहीर करत या नियमाचा भंग केला आहे. या चाचणीचे उत्तीर्ण होण्याचे निकष गुण 16.5 असतात.
क्रिकेटपटू आपल्या सरावाचे तसेच जीममधील व्यायामाचे फोटो पोस्ट करू शकतात मात्र, चाचणींतील किंवा बैठकीतील मुद्दे जाहीर करू शकत नाही. असे केल्यास तो बीसीसीआयच्या गोपनीयता नियमाचा भंग ठरतो. सध्यातरी कोहलीला केवळ समज देण्यात आली असून यापुढे त्याने असे केल्यास कठोर कारवाई करण्याचेही संकेत दिले आहेत.
सहा दिवसांचे सराव शिबिर…
आशिया करंडक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय क्रिकेटपटूंना अलूर येथे सहा दिवसांच्या सराव शिबिरात हजेरी लावावी लागणार आहे. हे शिबिर सुरू झाले असून कोहलीसह कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या यांनीही पहिल्या दिवशी योयो चाचणी उत्तीर्ण केली. शिबिरात प्रामुख्याने कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, महंमद शमी आणि महंमद सिराज यांचा समावेश आहे. जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन व तिलक वर्मा शनिवारपासून शिबिरात सहभागी होणार आहेत. या शिबिरात पहिल्या दिवशी योयो चाचणीसह इनडोअर सराव घेण्यात आला. आता शनिवारपासून प्रत्यक्ष मैदानावरील सरावाला प्रारंभ होणार आहे.
या चाचण्याही होणार…
– स्किल सेट चाचणी
– लिपिड प्रोफाइल
– रक्तातील साखर
– यूरिक ऍसिड
– कॅल्शियम
– व्हिटॅमिन बी 12 व डी
– क्रिएटिनिन
– टेस्टोस्टेरॉन व डेक्सा
अशी असते योयो चाचणी…
योयो चाचणी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची शारीरिक क्षमता मोजणारी चाचणी आहे. या चाचणीदरम्यान एकेक टप्पा पार झाला की बीप आवाज येतो. त्यामुळे याला काही देशांत बीप टेस्टही म्हणतात. यातील सर्व चाचण्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीची क्रीडा व क्रयशक्ती त्यांची क्षमता तपासण्यासाठी केल्या जातात. डेन्मार्कचे फुटबॉल फिजिओलॉजिस्ट डॉ. जेन्स बॅंग्सबो यांनी 1990 सालच्या दशकात इंटरमिटंट रिकव्हरी टेस्ट (योयो चाचणी) सगळ्यात पहिल्यांदा सुरू केली. त्यात फुटबॉलपटूंची तंदुरुस्ती तपासण्यासाठी सुरुवातीला ही चाचणी घेण्यात येत होती.
काही काळानंतर क्रिकेटसह अन्य खेळांतही योयो चाचणी घेतली जाऊ लागली. भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक शंकर बसू यांनी 2017 साली श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला या चाचणीची माहिती दिली व प्रायोगिक तत्त्वावर ही चाचणीही केली गेली. जर योयो चाचणीत 1800 गुण दिसले तर त्या खेळाडूने 18 मीटर अंतर कापले आहे असे समजले जाते. योयो चाचणीची सर्वोत्तम गुणसंख्या 23 असून अद्याप एकही खेळाडू ही संख्या गाठू शकलेला नाही.