मुंबई – अमेरिकेत व्याजदर वाढवण्याची शक्यता असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार पंधरा दिवसापासून भारतीय शेअर बाजारात विक्री करीत आहेत. शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी तब्बल 4,638 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. भांडवली वस्तू, बॅंकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रा तील कंपन्यांच्या शेअरची विक्री सध्या होताना दिसून येत आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 365 अंकांनी कमी होऊन 64,886 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 120 अंकांनी कोसळून 19,265 अंकावर बंद झाला. जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, पावर ग्रीड, आयटीसी, महिंद्रा, आयटीसी, टाटा मोटर्स या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. तर एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, ऍक्सिस बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
भारतातील महागाई वाढल्यामुळे व्याजदर आहे त्या पातळीवर राहतील किंवा वाढतील असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्याचबरोबर अमेरिका महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारास अस्वस्थ आहेत असे जिओजे वित्तीय सेवा या संस्थेचे विशलेषक विनोद नायर यांनी सांगितले.
मोठ्या कंपन्यांबरोबर छोट्या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा मिडकॅप 0.85 टक्क्यांनी तर स्मॉल कॅप 0.24 टक्क्यांनी घसरले. भांडवली वस्तू, रिऍल्टी, ऊर्जा, ग्राहक वस्तू या क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले तर दूरसंचार क्षेत्राचे निर्देशांक वाढले. आठवड्याच्या पातळीवर सेन्सेक्स 62 अंकांनी तर निफ्टी 44 अंकांनी कमी झाला आहे.