बारामती ( प्रतिनिधी) : बारामती शहरात करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी कारवाई करत पोलिसांनी विनाकारण विनाकारण करणारी ३० वाहने जप्त केली. तसेच दोन दुकाने सील केली आहेत. औषध विक्रेत्यांनी औषधाचे नावाखाली इतर साहित्याची विक्री केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिला आहे.
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी बारामती शहरात सात दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांनी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद दिला. काही ठिकाणी मात्र पोलिसांना कारवाई करावी लागली. पोलिसांनी आज विनाकारण फिरणारी ३० वाहने जप्त केली. तसेच दोन दुकाने सील केली आहेत.
शहरात १ उपविभागीय पोलीस अधिकारी, १२ अधिकारी व १२० कर्मचारी,राज्य राखीव दलाच्या तुकडीसह ४० गृहरक्षक दलाचे जवान नियुक्त केले आहेत.
बारामती शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे. सर्वच रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आली आहे. अंतर्गत रस्त्यांवर बॅरेगेट्स लावण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले की, आज विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांकडुन १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ३० वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.एका वाईन शॉपसह किराणा दुकान सील करण्यात आले आहे. काही मेडीकल दुकाने औषधांच्या नावाखाली बिस्कीट,चिप्स आदी सहित्य विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या दुकानांनी केवळ औषधांची विक्री करावी.औषधाच्या नावाखाली इतर विक्री केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक शिंदे यांनी दिला आहे. नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.