पुणे – ‘टीबीवरील औषधांचा पुरवठा ठप्प’ या मथळ्याखाली दैनिक ‘प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध करत रुग्णांचे हाल शासनाचे दुर्लक्ष या विषयावर प्रकाश टाकला होता. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘प्रभात’च्या बातमीचे कात्रण फेसबुक पोस्ट करत सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला आहे. ‘टीबीवरील औषधांचा पुरवठा नसणे ही गंभीर बाब असून, शासनाने तात्काळ दखल घ्यावी,’ असेही सुळे यांनी सांगितले.
शहरात क्षयरोग (टीबी) असलेल्या रुग्णांना केंद्र व राज्य सरकारकडून औषधे पुरवली जातात. ही सर्व औषधे संबंधित शहर व जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडून रुग्णांना पुरवली जातात. रुग्णांना औषधांसाठी वारंवार आरोग्य विभागात जावे लागू नये, यासाठी एका महिन्याची औषधे एकदम दिली जातात. मात्र, पुणे महापालिकेच्या क्षयरोग निर्मूलन विभागाकडून माहिती घेतली असता, त्यांच्याकडे केवळ महिनाभर पुरेल इतकाच औषधसाठा असल्याचे समोर आले.
त्यातही ‘लाइनोझोलिड’ आणि “सायक्लोसरिन’ या दोन महत्वाच्या औषधांचा पुरवठा केंद्र सरकारकडून न झाल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून रुग्णांना औषधे मिळत नाही. याबाबत दैनिक “प्रभात’ने वस्तूस्थिती मांडली. या वृत्ताची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेत राज्य सरकारसह आरोग्य विभाग आणि फेसबुकवर ही बातमी पोस्ट करत सरकारला याकडे गांभिर्याने पाहण्याचा सल्ला दिला.
“औषधे नसल्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून, शासनाने याची दखल घेण्याची गरज आहे. टीबीसारख्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा राज्याच्या आरोग्य खात्याने आरोग्य केंद्रात उपलब्ध करणे गरजेचे आहे,’ असे त्यांनी सांगत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि पुणे महापालिका यांना हे टॅगदेखील केले आहे.