बारामती – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बारामतीच्या ग्रामीण भागात लाल मातीतल्या कबड्डीचा आवाज पुन्हा घुमू लागला आहे. तालुक्यातील डोरलेवाडी येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून कबड्डीच्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातून 60 संघांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. विजेत्या संघास सात फुटाचा आकर्षक चषक दिला जाणार आहे.
बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत येथील हनुमान स्पोर्ट क्लबच्या वतीने या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कबड्डी सामन्यांचे उद्घाटन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर, किरण तावरे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी ऋतुराज काळे पंचायत समिती सदस्य राहुल झारगड सरपंच बाळासो सलवदे, उपसरपंच शहाजी दळवी, कांतीलाल नाळे, अविनाश काळकुटे, बाबुराव गवळी, रामभाऊ कालगावकर, हरिभाऊ आटोळे, अजित जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कोरोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणे अनेक निर्बंध आले होते मात्र आता परिस्थिती हळूहळू सुधारू लागल्याने अनेक निर्बंध शिथिल होऊ लागले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील अस्सल तांबड्या मातीतील कबड्डीचे सामने आता गावोगावी होऊ लागले आहेत. कबड्डी स्पर्धेमध्ये विजेते संघाला चक्क सात फुटाचा आकर्षक चषक या स्पर्धेमध्ये असल्याने तो मिळवण्यासाठी या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळाडूंची चढाओढ लागणार आहे. विविध जिल्ह्यातून 60 संघ सहभागी झाले आहेत. यात मुंबई, बीड, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातील संघांनी यात सहभाग घेतला आहे.