Baramati Lok Sabha Election 2024 – रिक्षा, टेम्पो तसेच कॅब चालक आणि फूड डिलिव्हरी बॉय या व्यवसायातील गीग वर्कर्स यांच्या मागण्यांबाबत कोणत्याही राजकीय पक्षाने गांभीर्य न दाखविले जात नसल्याचे कारण देत ‘बघतोय रिक्षावाला’ या संघटनेने जिल्ह्यात चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे बारामती मतदारसंघातून शरद पवार नावाच्या एका रिक्षाचालकाला उमेदवारी देण्यात आली आहे. बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी ही माहिती दिली.
आम्ही मतदानाद्वारे आमचे आंदोलन मतपेटीतून पुढे नेत आहोत. या चार लोकसभा मतदार संघातील, ४ लाख गिग वर्कर्स व त्यांचे १६ लाख कुटुंबीय आमच्याच उमेदवारांना मतदान करून आमची ताकद आम्ही राजकीय पक्षांना दाखवून देऊ, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
त्यासाठी बारामती मधून शरद पवार (रिक्षाचालक ) पुणे लोकसभा मतदारसंघातून मनोज वेताळ (टेम्पो चालक ), मावळ मतदारसंघातून संतोष वालगुडे ( कॅब चालक ), तर शिरूर मधून स्वप्नील लोंढे (फूड डिलिव्हरी बॉय ) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.