बारामती – गुन्हा दाखल होताच दीड लाखाची मोटर सायकल परत फिर्यादीच्या दारात आणून सोडल्याची घटना बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय शेजारील कृष्णा गंगा अपार्टमेंट येथे घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रॉबीन वसंतराव गायकवाड यांनी याबाबत दि (२१) रोजी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांनी त्यांच्या मुलासाठी बजाज कंपनीची ड्यू केटीएम 250 सीसी इंजिन असलेली मोटर सायकल क्रमांंक (एम एच 42 ए डब्ल्यू 4334)दीड लाखाची मोटर सायकल विकत घेतली. सदर मोटरसायकल त्यांनी रात्रीच्या वेळेस कृष्णा गंगा अपार्टमेंट टीसी कॉलेज जवळ येथे पार्क करून ठेवली. दि(17 )डिसेंबर च्या रात्री ती गाडी संपूर्ण आटोमॅटिक लॉक असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरली.
गाडी महागडी असल्याने व सहजासहजी आरोपीला चोरून नेता येणे शक्य नसल्याने तात्काळ तपास पथकास सदर घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिसरात चौकशी करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिले.
ज्या दिवशी तपास पथकाने त्या ठिकाणी भेट दिली त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री सदरची मोटरसायकल परत फिर्यादी यांच्या दारात रात्री आणून ठेवण्यात आली. सदर बाबत पोलीस खरंच मोटारसायकल चोरी गेली होती का दुसरा काही प्रकार आहे याबाबत चौकशी करत आहेत. गाडी मिळाल्याने गायकवााड कुटुंब यांनी समाधान व्यक्त केले. पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगवान दुधे तपास करीत आहेत. मोटरसायकल मिळाली असली तरी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.