बारामती – विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूला १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा येथील जिल्हा न्यायाधीश जे. ए. शेख यांनी सुनावली. शहरातील चिमण शहा मळा येथील आरोपी पती अरबाज मेहमुद पठाण, सासू मुमताज मेहमुद पठाण यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर आरोपी अनिल पोपट मेमाणे यांनी मारहाण केल्याप्रकरणी ३ महिने साधी कैद सुनावली.
याबाबतथोडक्यात हकीकत अशी की,फिर्यादीची मुलगी करिश्मा हीचे लग्न बारामती शहरातील चिमण शहा मळा येथील अरबाज महेमुद पठाण याचेबरोबर झाले होते. लग्न झाल्यानंतर लगेचच अरबाज महेमुद पठाण, तसेच सासु मुमताज महेमुद पठाण व इतर इसम अनिल पोपट मेमाणे या सर्वांनी मिळून संगनमत करुन मयत करीश्मा हीचा शारीरीक व मानसिक छळ सुरु केला.
मयत करीश्मा हीस आरोपी अरबाज पठाण याचे बाहेरील अनैतिक संबंध चालू ठेवू देणेसाठी, तसेच माहेरुन पैसे आणण्यासाठी मयत करीश्मा हीस शिवीगाळ, मारहाण व मानसिक त्रास व छळ करत होते व फोनवर बोलू न देणे व शारीरीक व मानसिक त्रासाला कंटाळून लग्नानंतर दोन महिन्यात करिश्मा हीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.
वरील कारणांवरुन बारामती शहर पोलीस स्टेशन येथे तिचे वडील सिराजउद्दीन मेहबूबसाब सय्यद यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यामध्ये तपासी अधिकारी योगेश शेलार पोलिस उपनिरीक्षक यांनी तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले. सदरची केस वरील कोर्टात चालवून सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांनी एकूण ८ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा व केलेला युक्तीवाद मे. कोर्टाने मान्य करुन आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सरकार पक्षास कोर्ट पैरवी ओ.एस.आय. नामदेव नलवडे व म.पो.शि. उमा कोकरे यांनी मदत केली.