विविधा: बापू नाडकर्णी

माधव विद्वांस

प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारे भारताचे डावखुरे फिरकी गोलंदाज बापू नाडकर्णी यांचे आज अभीष्टचिंतन. क्रिकेटमधील मर्यादित षटके, आयपीएल यांच्या झगमगाटात जुन्या जमान्यातील क्रिकेटपटू व त्यांच्या खेळाचे रोमांचकारी क्षण आपण आता विसरत चाललो आहोत. पैसा, प्रसिद्धी आणि फिक्‍सिंगचे पाप या तीन “प’मध्ये खेळाचा मूळ पाया नष्ट होतो की काय अशी भीती वाटते. अशा वेळी बापू नाडकर्णी यांची आठवण येणे साहजिक आहे.
अष्टपैलू बापू नाडकर्णी यांचा जन्म 4 एप्रिल 1933 रोजी नाशिक येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी असले तरी ते “बापू’ या नावानेच ओळखले जातात. त्यांच्या गोलंदाजीच्या अनेक कथा आणि किस्से सांगितले जातात, खेळपट्टीवर एक नाणे ठेवून ओळीने 50 वेळा उडविणारे म्हणूनही बापू प्रसिद्ध आहेत. पूर्वीचे समालोचक समीक्षक म्हणायचे बापू आपल्या गोलंदाजीत एकही चूक करीत नाहीत हीच सगळ्यात मोठी चूक ते करतात.

1950-51 मध्ये पुणे विद्यापीठासाठी रोहिंटन बरिया ट्रॉफी सामन्यात बापू नाडकर्णींनी क्रिकेट खेळामधे प्रवेश केला. त्यांना लगेचच महाराष्ट्राकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये संधी मिळाली. मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर तीन तासांत 103 धावा काढून पहिले शतक झळकावले. त्यांच्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघामध्ये त्यांचा समावेश झाला. कसोटी सामन्याचे पदार्पणातच 16 ते 21 डिसेंबर 1955 रोजी न्यूझीलंड विरुद्ध दिल्ली येथील फिरोजशहा कोटला मैदानावर सामन्यात प्रथम संधी मिळाली. त्या सामन्यात त्यांनी 68 धावा केल्या. 57 षटके गोलंदाजी केली; पण एकही बळी मिळाला नव्हता. त्याच वर्षी मंकड निवृत्त झाले व बापू नाडकर्णी कप्तान झाले. ते निर्धाव षटके टाकण्यासाठी प्रसिद्ध होते.

त्यांच्या गोलंदाजीच्या पराक्रमामुळे ते प्रसिद्ध आहेत. प्रथम श्रेणी आणि कसोटी सामन्यातील त्यांची गोलंदाजीची आकडेवारी पाहिल्यावर अनेकांनी त्यांना सगळ्यात कमी धावा देणारे गोलंदाज म्हणून मानले आहे. कानपूर येथील पाकिस्तान विरुद्ध सन 1960-61 मध्ये सामन्यात त्यांच्या गोलंदाजीचे पृथक्‍करण 32 षटकात-24 निर्धाव-23 धावा-0 बळी असे होते तर पुढील दिल्लीच्या सामन्याचे चित्र 34 षटके-24 निर्धाव-24 धावा-1 बळी असे होते. 1964 साली मद्रास येथे इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यातील त्यांची गोलंदाजीची आकडेवारी 32-27-5-0 अशी होती. यातील सलग 21 षटके त्यांनी निर्धाव टाकली आहेत आणि हा विक्रम आजही त्यांच्याच नावावर आहे. त्यांनी 41 कसोटी सामने खेळले.

70 च्या सरासरीने 1414 धावा काढल्या, तर 1 शतक व 7 अर्धशतके त्यांच्या नावावर आहेत.तसेच कसोटीमधे 88 बळीही त्यांनी घेतले. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 191 डावांमध्ये 8880 धावा काढल्या, तर 14 शतके व 46 अर्धशतके काढली तसेच 500 बळी घेतले. कसोटीत त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती 122, तर प्रथम श्रेणीमध्ये एकदा त्यांनी 283 धावा काढल्या होत्या. न्यूझीलंड विरुद्ध ते पहिला सामना भारतात खेळले व न्यूझीलंडमध्ये त्यांनी शेवटचा कसोटी सामना खेळला आणि त्यांनी निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीनंतर काही काळ ऑस्ट्रेलियामध्ये प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.