नवी दिल्ली – दहशतवादी कारवायांच्या आरोपामुळे “एनआयए’साठी वॉन्टेड असलेल्या निसार अहमद तांत्राय याचे संयुक्त अरब अमिरातीकडून भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. संयुक्त अरब अमिरातीकडून भारतात पाठवल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याला अटक केली आहे. त्याला 2017 साली दक्षिण काश्मीरमधील “सीआरपीएफ’च्या तळावर हल्लाशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
याच हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार म्हणून फयाझ अहमद माग्राय याला महिन्याभरापूर्वीच “एनआयए’ने पुलवामामधून अटक केली होती. त्याच्यावर अन्य दहशतवाद्यांना सहकार्य देणे आणि आश्रय देण्याचाही आरोप आहे.
निसार हा अलिकडेच “युएई’ला निघून गेला होता. यावर्षी 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये “सीआरपीएफ’च्या वाहनांच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागील हस्तक मुदासीर अहमद खान याच्या संपर्कात निसार असल्याचे मानले जात होते. निसार हा जम्मू काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदचे पुनरुज्जीवन करणाऱ्या नूर त्रालीचा भाऊ आहे. निसार तांत्राय याला विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्याला “एनआयए’ची कोठडी सुनावण्यात आली आहे.
दक्षिण काश्मीरमधील लेथपोरा येथील “सीआरपीएफ’च्या तळावर 30 डिसेंबर 2017 च्या रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 5 सुरक्षा कर्मचारी शहिद झाले होते. तर जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांचाही खात्मा झाला होता. ही चकमक तब्बल 36 तास चालली होती. जैश ए मोहम्मदने या तळावर हल्ला करण्यासाठी तीन आत्मघातकी दहशतवादी पाठवले होते. त्यामध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्या 16 वर्षीय मुलाचाही समावेश होता. हा मुलगा काही महिन्यांपूर्वीच दहशतवादी गटामध्ये सामील झाला होता.