बॅंकांची अनास्था शेतकऱ्यांच्या मुळावर

खरीप अंतिम टप्प्यात असतानाही कर्जवाटपाकडे कानाडोळा

मुंबई- निसर्गाच्या लहरीपणासोबतच शेतकऱ्यांना राज्यातील बॅंकांच्या गलथान कारभारामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खरिपासाठी देण्यात येणारे पीक कर्ज वाटप हे खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. बॅंकानी केवळ उद्दिष्टाच्या 71 टक्केच कर्ज वाटप केले असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

खरिपातील मशागतीपासून ते काढणाची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना हंगामाच्या तोंडावर पीक कर्जाचे वाटप करण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे शेती कामे वेळेत मार्गी लागतील आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. पण राज्यातील बॅंकांनी याकडे कानडोळा करीत शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी 50 लाख 39 हजार शेतकऱ्यांना 40 हजार 790 कोटींचे कर्ज उद्दिष्ट घालून देण्यात आले होते.

मात्र, या रकमेच्या केवळ 71 टक्केच रक्कम बॅंकांना वितरीत केली आहे. सर्व पिकांसाठी ठरवून दिलेले कर्ज वाटप करणे आवश्‍यक असते. मात्र, बॅंक अधिकारी कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सरकारचा उद्देश हा केवळ कागदावरच राहत आहे. आता सप्टेंबर महिना सुरु असून 35 लाख 37 हजार शेतकऱ्यांना 28 हजार 764 कोटी कर्ज देण्यात आले आहे. पुणे विभागात सर्वाधिक तर औरंगाबाद विभागात सर्वात कमी कर्ज वाटप केले आहे.

जिल्हा बॅंकेकडून 100टक्के कर्ज वाटप
राष्ट्रीयकृत बॅंकांकडून कर्ज वाटपास दिरंगाई केली जात आहे. पण गावस्तरावर ज्या बॅंकेच्या शाखा आहेत त्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी कर्ज वाटपाचे टार्गेट हे पूर्ण केले आहे. जिल्हा बॅंकेने 23 लाख शेतकऱ्यांना 13 हजार 649 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी केवळ 8 लाख 83 हजार शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप केलेले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.