इंद्रायणीनगर – भोसरी औद्योगिक परिसरात सुविधांचा अभाव असल्यामुळे उद्योजकांची गैरसोय होत आहे. येथे मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
इंद्रायणीनगर प्रभागातील सेक्टर क्र. 7 व 10 हा औद्योगिक परिसर म्हणून नावाजलेला आहे. येथे लहान मोठ्या उद्योगांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. येथील रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर तक्रार देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने उद्योजकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
इंद्रायणीनगर येथील सेक्टर क्रमांक 7 व 10 मध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उद्योगांचे उद्योगसमूह असून, नावाजलेल्या उद्योगांकरिता लागणारे सुटे भाग बनविणारे छोट्या मोठ्या उद्योगांचे या परिसरात प्राबल्य आहे.
औद्योगिक परिसरात एकही रस्ता सुस्थितीत नाही. विश्वेश्वर चौकामधून इंद्रायणीनगर, स्पाइन सिटी, गवळी माथा आदी ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. रस्त्याचे काम होऊनसुद्धा बारीक खडी रस्त्यावरच पडून असल्यामुळे अपघात घडत आहेत. रस्ता दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. दुभाजकावर वाढलेली झाडे रस्त्यावर डोकवू पाहत आहेत. अवजड वाहनांमधून वाट काढताना अपघाताची शक्यता वाढली आहे. स्पाइन चौकाकडून येताना याचा प्रत्यक्ष अनुभव येतो.
स्वच्छतागृहे कुलूपबंद
मुख्य चौक असलेल्या विश्वेश्वर चौकात स्वच्छतेचा बोऱ्या वाजला आहे. रस्त्याच्या कडेला धूळ, माती, प्लॅस्टिकच्या बाटल्या, कागद, कापडी चिंध्या, खडी, सांडपाणी रस्त्यातून वाहताना दिसून येते. रस्त्यांची कित्येक दिवस झाडलोट केली नाही. सेक्टर क्र. 7 मधील संकल्प वजनकाट्यासमोर असलेल्या स्वच्छतागृह पूर्ण होऊनही कुलूपबंद अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांची तसेच महिला कामगारांची कुचंबणा होत आहे.
नवनगर विकास प्राधिकरणाचा येथे मोकळा भूखंड आहे. या जागेत कचरा टाकला जात आहे. त्याला आग लावल्याने परिसरात उग्र वास येत आहे. त्यामुळे वातावरण प्रदूषित होऊन कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सेक्टर 10 मधील 128/ए 10, सेक्टर 7 मधील 105 मध्ये कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.
अवजड वाहने थेट रस्त्यावर
औद्योगिक परिसरात अवजड वाहनांसाठी वाहनतळाची सोय नसल्यामुळे अवजड वाहने रस्त्यावर उभी केलेली असतात. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सेक्टर क्रमांक 4/20 मध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. चार-पाच पाण्याचे टॅंकर रस्त्यावर नेहमी उभे असतात. येथे टॅंकरमधील पाण्यामुळे चिखल झाला आहे. सेक्टर 10 मधील 128/ए 10 सेक्टर 7 मधील 105 मध्ये कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.
आम्ही सारथी हेल्पलाइनवर तक्रार दाखल केली होती. आमची कंपनी पुणे टेक्ट्रॉल प्रा. लि., एस 18, एमआयडीसी भोसरी येथे आहे. आमच्या कंपनीच्या समोरील बाजूस दररोज राडारोडा व कचरा मोठ्या प्रमाणात ट्रॅकटरद्वारे टाकला जात आहे. सदर घाणीमुळे आमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनी समोर अक्षरशः डम्पिंग ग्राउंड केले आहे. सतत पाठपुरावा करूनही आरोग्य व स्थापत्य विभागाने हात वर केले आहेत.
– रामेश्वर बोंगाळे, कार्यकारी प्रशासन अधिकारी,
पुणे टेक्ट्रॉल प्रा. लि., भोसरी