ज्ञानदीप लावू जगी : हभप प्रशांत महाराज मोरे देहुकर

बहु मृगजळ देखोनि डोळां । थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा । तोडिला परिसु बांधिला गळां । शुक्‍तिकालाभें ।।61।। तैसी अहंममतेचिये लवडसवडी । मातें न पवतीचि बापुडीं । म्हणौनि जन्ममरणाची दुथडीं । डहुळितें ठेलीं ।।62।। एर्हवीं मी तरी कैसा । मुखाप्रति भानु कां जैसा । कहीं दिसे न दिसे ऐसा । वाणीचा नोहे ।।63।। अध्याय 9 वा

संसारामध्ये रत असल्यामुळे भगवंताच्या अस्तित्वाविषयी अनभिज्ञ असणाऱ्या लोकांविषयी माऊली प्रतिपादन करतात. सर्वत्र पूर्णपणे भरलेले मृगजळ डोळ्यांनी पाहून अर्धवट गिळलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा किंवा शिंपले सापडल्यामुळे गळ्यात बांधलेला परिस तोडावा, त्याप्रमाणे देहाला मी आणि स्त्री पुत्रांना माझे समजण्याच्या गडबडीत हे लोक भगवंताला प्राप्तच होत नाहीत.

म्हणून एकदा जन्माच्या आणि एकदा मरणाच्या दोन तीरावर असलेल्या डोहात गटांगळ्या खात राहतात. मी कसा आहे? प्रातःकाली पूर्व दिशेकडे तोंड केल्यास तोंडापुढे सूर्य असतो, तेव्हा सूर्याच्या अस्तित्वाविषयी कोणालाही संशय नसतो व भ्रमही नसतो. तसे माझे अस्तित्व स्वयंप्रकाशाइतके स्पष्ट आहे. म्हणून मी आहे किंवा नाही हा बोलण्याचा विषयच होत नाही.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.