मोदींच्या काळात बॅंक घोटाळे सात पटीने वाढले

पृथ्वीराज चव्हाण : मुुख्यमंत्री करताहेत जनतेची दिशाभूल
मुंबई : रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये 73 हजार कोटींचे घोटाळे झाले आहेत. यामध्ये मोदी सरकारच्या काळात बॅंक घोटाळे सात पटीने वाढले आहेत. घोटाळेबाजांचे सरकारमधील उच्च पदस्थांशी संबंध आहेत, असा आरोप करतानाच अशा घोटाळेबाजांची नावे जाहिर करावीत व त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत भाजपकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्‍वभूमिवर पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत मोदी व भाजपवर टिका केली. पीएमसी घोटाळ्यात ठेवीदारांचे पैसे संकटात आले आहेत. बॅंकींग नियमाचे उल्लंघन करून एका उद्योगपतीला 73 टक्के कर्ज वाटप केले. तेव्हा राज्याचे आणि केंद्राचे सहकार खाते काय झोपले होते का? असा सवाल करताना घोटाळेबाजांचे सरकारमधील उच्च पदस्थांशी संबंध असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

विधानसभा निवडणूक राज्यातील फडणवीस सरकारच्या पाच वर्षाच्या कामकाजाचे मुल्यमापन करणारी आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी राज्यासाठी काय केले याचा हिशोब त्यांनी जनतेला द्यायला हवा. परंतु तसे न करता मुख्यमंत्री मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी कलम 370 आणि काश्‍मीरबाबत बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

भाजप सरकारच्या काळाच देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक वळणावर पोहोचली आहे. जगातील अनेक निष्पक्ष संस्था अर्थव्यवस्थेची घसरण होत असल्याचे सांगत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्षांनी अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. नेपाळ आणि बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा वेग भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त राहील, असा अंदाज जागतिक बॅंकेने वर्तवला आहे.

यावर उपाययोजना करण्याऐवजी केंद्र सरकारचे मंत्री अर्थव्यस्थेबद्दल बेताल वक्तव्ये करत आहेत हे दुर्देवी आहे. मंदीचा राज्यातील उद्योगांवर विपरीत परिणाम झाला असून लाखो लोक बेरोजगार होत आहेत मुख्यमंत्र्यांनी त्यावर काही बोलावे, असे आव्हान चव्हाण यांनी दिले.

घोटाळेबाज मंत्र्यांवर कारवाई करा !
फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप आहेत. मुख्यमंत्र्यांनी फक्त त्यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्या घोटाळ्याची चौकशी करून त्यांच्यावर खटले का भरले नाहीत. लोकायुक्तांच्या अहवालात प्रकाश मेहतांवर ठपका ठेवला आहे. मेहतांनी मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे, असा शेरा लिहिला होता. त्याबाबत लोकायुक्तांनी मुख्यमंत्र्यांची चौकशी केली का, हे स्पष्ट करावे. सरकारने चौकशी अहवाल जाहीर करावा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.