शिक्रापूर (वार्ताहर) – शरद सहकारी बॅंकेच्या शिक्रापूर शाखेत जमीन तारण देऊन बॅंकेतून तीन कोटी रुपये कर्ज घेतले. हे कर्ज न भरता बॅंकेला तारण दिलेल्या जमिनीची बॅंकेच्या परस्पर विक्री करीत बॅंकेला फसवल्याचे प्रकरण उघडकीय आले आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात एक माजी मंत्री दर्जाचा व्यक्ती, वकील व शिक्षिकेसह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शैला सुरेश भुजबळ, जयश्री शिवाजी धुमाळ, राजेश शिवाजी धुमाळ, सुरेश काशिनाथ भुजबळ (सर्व रा. तळेगाव रोड, शिक्रापूर) व वेंकट एस. चलसानी (रा. इंदिरा सोसायटी, वडगाव शेरी, ता. हवेली) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याबाबत शरद सहकारी बॅंकेचे वसुली विभाग प्रमुख राजाराम मारुती डेरे (वय 45, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली
शरद सहकारी बॅंकेच्या शिक्रापूर शाखेतून सुरेश भुजबळ यांनी व्यवसाय वाढीसाठी 2013 साली तीन कोटी रुपये कर्ज घेतले होते. कर्ज घेताना जामीनदार शैला भुजबळ, जयश्री धुमाळ, राजेश धुमाळ व वेंकट चलसानी यांच्या नावे असलेल्या वेगवेगळ्या जमीन व इमारत बॅंकेला तारण म्हणून दिली. त्यानंतर भुजबळ यांनी बॅंकेचे कर्ज हप्ते भरले नसल्याने सर्वांना बॅंकेकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. तरी देखील बॅंकेच्या कर्जाचे पैसे भरले नसल्याने जमिनीवर जप्तीचे आदेश देखील काढण्यात आले.
यावेळी कर्जदार व जामीनदार यांनी बॅंकेला वेगवेगळ्या स्वरूपाचे चेक देऊन रक्कम भरणार असल्याचे कबूल केले; मात्र ही रक्कम बॅंकेला भरली नाही. दरम्यान बॅंकेचे वकील यांनी बॅंकेला तारण दिलेल्या जमिनीचे सर्च रिपोर्टमध्ये बॅंकेला तारण दिलेल्या जमिनीची 2014 व 2015 मध्ये बॅंकेची परवानगी न घेता फसवणूक करत तारण दिलेली जमीन परस्पर इतर व्यक्तींना विक्री केली असल्याचे समोर आले.
दरम्यानच्या काळात सुरेश भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करत कर्ज भरणार असल्याचे सांगितले. बॅंकेला कर्जदार व जामीनदार यांच्या नावे दिलेले सर्व चेक बाउंस केले व कर्ज भरलेच नाही. त्यामुळे बॅंकेकडून कर्ज घेऊन तारण दिलेली मालमत्ता देखील परस्पर विक्री करून बॅंकेची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके व प्रताप कांबळे हे करीत आहेत.