पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्यात सर्वत्र ऊस तोडणी सुरू आहे, यामुळे बिबटे सैरावैरा झालेले आहेत. बिबट्यांचा वावर मानवी वस्त्यांवर आपल्याला बछाड्याबरोबर मोठ्या प्रमाणात वाढला असून, हे बिबटे शेळ्या, मेंढ्या, गोठ्यातील वासरे तसेच पाळीव कुत्र्यांवर हल्ले करून त्यांचा फडशा पाडत आहेत. शिवाय नागरिकांना दररोज बिबट्यांचे दर्शन घडत आहे.
तालुक्यातील पिंपळगाव, अवसरी, चांडोली, पारगाव, देवगाव, लाखणगाव, जारकरवाडी, वळती आदी परिसरात बिबट्यांचा वावर आहे. या परिसरात घोडनदी, मीनानदी यावर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असल्याने पाण्याची उपलब्धता आहे. नदीच्या काठी मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे तसेच शेतात ऊस क्षेत्र असल्याने बिबट्यांनी हेच आपले घर मानलेले आहे. लहान बछड्यांना याच निवाऱ्याची सवय लागली आहे. सध्या शेतातील ऊसतोडणी सुरु असल्याने बिबट्यांचा निवारा, लपणक्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे बिबटे आपल्या बछड्यांबरोबर लपण्यासाठी धावपळ करीत आहेत. भक्ष्य शोधण्यासाठी कधी मानवी वस्त्यांवर येत आहेत.
जारकरवाडीच्या ढोबळेवाडी येथे बिबट्या पकडण्यास वनविभागाला यश आले आहे. साधारणपणे दोन-तीन वर्षे वयाचा असणाऱ्या बिबट्याने ढोबळेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेळ्या-मेंढ्यांवर हल्ला केले होते. रामचंद्र ढोबळे यांच्या शेळ्यांवर तब्बल तीन वेळा हल्ला केला. एक महिन्यापूर्वी लहू बबन ढोबळे यांच्या शेळीवरही हल्ला केला. या परिसरात नियमितपणे शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत होते. अखेर ग्रामस्थांच्या विनंतीवरून वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावला आणि बिबट्या जेरबंद झाला. वनपाल एस. एन. अनासुने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने योग्य निर्णय घेत पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त केल्याने स्थानिक रहिवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.
त्याचप्रमाणे काठापुर बुद्रुक येथील भोकरवाडीमध्ये विश्वनाथ राघु हिंगे या शेतकऱ्यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना एक ते दीड महिने वयाचा बिबट्याचा बछडा आढळून आला. माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य विशाल करंडे यांनी वनरक्षक एस. एन. अनासुने यांना कळवले. अनासुने व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बछडा ताब्यात घेऊन. ज्या ठिकाणी सापडला आहे त्या ठिकाणी सोडून दिला.
तालुक्याच्या पूर्व भाग मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. काल पारगाव याठिकाणी बछडा आढळून आला होता. उपासमारीमुळे त्या बछड्याचा मृत्यू झाला. आज सकाळी जारकरवाडी येथे बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. उसाचे मोठ्या प्रमाणात असणारे क्षेत्र हे बिबट्यासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे.