गुजरातमधील कंपनीच्या 18 कोटीची मालमत्ता जप्त
नवी दिल्ली : गुजरातमधील एका कंपनीची नऊ पवन उर्जा यंत्रे आणि जमीन अशी 18 कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचनालयाने (इडी) जप्त केली. कथित बॅंक घोटाळ्यात ही कारवाई करण्यात आल्याचे इडीच्या वतीने सांगण्यात आले.
सुरतमधील नाकोडा लिमिटेड आणि चेअरमन, कार्यकारी संचालक बाबूलाल गुमनमल जैन आणि त्यांचा मुलगा आणि सह कार्यकारी संचालक देवेंद्र यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कंपनीने कॅनरा बॅंकेसह 13 बॅंकांकडून कर्ज घेतले होते. या थकीत कर्जाची रक्कम दोन हजार 107 कोटी रूपयांवर आली आहे. व्यापारी पुनित रूंगठा आणि चार्टड अकाउंटंट जगदिश सोमाणी यांना हाताशी धरून खोटी विक्री दाखवली.
कच्च्या मालाच्या खरेदीची बानावट बिले सादर केली. या सर्व बनावट कागदपत्रांच्या आधारे बॅंकांना सादर करून चार हजार 207 कोटी रुपयांसाठी एक हजार 212 लेटर ऑफ क्रेडिट सादर केली. या पैकी 202 लेटर ऑफ क्रेडिट कंपनीची देय असणाऱ्या 827 . 98 कोटी रूपयांसाठी सादर करण्यात आली.
या पैशातून कंपनीची अन्य कर्जे आणि दैनंदिन खर्च भागवण्यात आला. वस्तूत: या कारणासाठी कर्ज देण्यात आले नव्हते. पवन उर्जा संच आणि जमीन तामीळनाडू तिरूनेरवेली येथील कंपनीच्या आवारातील आहेत. या जप्तीमुळे एकून 393 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.