ढाका – भारताचे मसाले जगभरात प्रसिध्द असून त्यांना जगात सगळीकडे मागणी आहे. त्यामुळेच भारताला जगाचा स्पाइस किंग अर्थात मसाला किंग असेही म्हटले जाते. त्यामुळेच जागतिक बाजारात भारतातील मसाल्यांची सर्वाधिक विक्री होत असते. भारतीय मसाल्यांच्या मोठ्या खरेदीदारांच्या यादीत सौदी अरबचे नाव अग्रभागी आहे. मात्र आता अचानक या क्षेत्रात भारताला बांगलादेशाकडून होणाऱ्या स्पर्धेचा सामना करावा लागतो आहे.
बांगलादेशच्या निर्यात चालना ब्यूरोच्या अहवालानुसार त्या देशाने या वर्षी जुलै ते नोव्हेंबर या काळात आखातातील देशांना १४१ कोटींपेक्षा अधिक रूपयांची मसाल्यांची निर्यात केली आहे. यातील निम्मेपेक्षा अधिक निर्यात ही एकट्या सौदी अरबमध्ये झाली आहे. त्यामुळे सौदी हा बांगलादेशी मसाल्यांसाठी मोठी बाजारपेठ म्हणून उदयाला आला आहे असे मानले जाते आहे.
दरम्यान, बांगलादेशच्या बीडी फूड या कंपनीचे एक्स्पोर्ट विभागाचे प्रमुख मोहम्मद सजादुल करिम यांच्या म्हणण्यानुसार आखातात सौदी अरब हाच आमचा खरेदीदार देश आहे. त्यानंतर संयुक्त अरब अमिरात, जॉर्डन आणि ओमानचा यांचा क्रमांक लागतो. सौदीमध्ये आमच्या मसाल्यांना मागणी वाढली आहे. अलिकडच्या काळात आमचे सगळे ग्राहक दर्जेदार उत्पादनांचा लाभ घेत आहेत. भारतीय मसाल्यांना मागे टाकत आमचे मसाले आखाती देशांतील बाजारपेठेवर कब्जा करत आहेत.
सजादुल करिम म्हणाले की सौदीमध्ये आमची हक्काची बाजारपेठ आहे कारण त्या देशात २६ लाखांपेक्षा अधिक बांगलादेशी राहतात. ही सगळी मंडळी कामानिमित्त सौदीमध्येच वास्तव्याला आहेत. सौदीमध्ये येणाऱ्या बाहेरच्या मंडळींमध्ये बांगलादेशचा मोठा वाटा आहे. बीडी फूड प्रामुख्याने हळद, मिरची, धने पूड, जीरे पूड यांची निर्यात करते.