विविध वस्तू प्रदर्शन आणि विक्रीसाठी असतील उपलब्ध : “दिल्ली हट’च्या धर्तीवर बाजार
पुणे – पुण्यातील नागरिकांना बांबूच्या आकर्षक वस्तू उपलब्ध व्हाव्यात तसेच शहरात बांबू उत्पादनाला अधिक चालना मिळावी यासाठी पाचगाव पर्वती येथे लवकरच “बांबू बझार’ची उभारणी केली जाणार आहे. दिल्लीतील “दिल्ली हट’च्या धर्तीवर हा बांबू बाजार उभारला जाणार असून बांबूपासून बनविलेल्या विविध कलाकुसरींच्या वस्तू याठिकाणी प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध असतील.
व्यापक वृक्षारोपण मोहिमेंतर्गत राज्यात बांबू उत्पादनाला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. कमी कालावधीत, कमी खर्चात उत्पादित होणारे आणि अतिशय उपयुक्त पीक म्हणून बांबू ओळखले जाते. या बांबूचा उपयोग करून बांबू उद्योगाची उभारणी आणि पर्यावरणपूरक वस्तूला चालना देण्यासाठी बांबूपासून निर्मिती केलेल्या वस्तूंचे एकत्रितपणे एक कायस्वरूपी प्रदर्शन भरविण्यासाठी बांबू बजार उभारला जाणार आहे. तळजाई टेकडी येथील पाचगाव पर्वती परिसरात हा बझार उभारणार असून वनविभागातर्फे याची उभारणी केली जाणार आहे.
विभागाने बांबू वन उभारणीचे काम यापूर्वीच हाती घेतले आहे. आता त्याला उद्योजकतेची जोड मिळाल्यास त्यातून नक्कीच बांबूची उपयुक्तता वाढेल. इतकेच नव्हे तर सहजपणे उपलब्ध होणाऱ्या बांबूच्या वस्तूंमुळे नागरिकांच्या जीवनातही पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा देखील उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांनी व्यक्त
केली.
बांबू बाजारची वैशिष्टये
बांबूपासून बनविलेल्या विविध वस्तूंची एकाच ठिकाणी उपलब्धता
आकर्षक रचनेमुळे पर्यटनासाठी वेगळा पर्याय
बांबूनिर्मिती आणि उद्योजकतेला चालना
पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन
बाबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे
पाचगाव पर्वती येथे बांबू बझार उभरण्याच्या प्रकल्पाला राज्यसरकारकडून मंजूरी मिळाली आहे. बांबू महामंडळाकडून निधी देखील मंजूर झाला आहे. नुकतेच शहरातील काही बांबूच्या वस्तूंचे उत्पादक आणि व्यावसायिक यांच्याशी विभागाने चर्चा केली असून त्यांनी देखील या प्रकल्पासाठी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. विभगाने या संदर्भातील बहुतांश काम पूर्ण केले आहे.
– ए. श्रीलक्ष्मी, उपवनसंरक्षक