शरीर व मनाचा समतोल

- डॉ. दीप्ती पोतदार

दिवसभराच्या कामाच्या थकव्यामुळे कधी एकदा झोप लागते याचा विचार होतो. मात्र झोपताना योग्य स्थितीमध्ये झोपलो आहोत का याचा विचार येत नाही. बसणे, उठणे, उभे राहणे, चालणे आणि झोपणे या क्रिया चुकीच्या पद्धतीत सतत चालू राहिल्या की सवयीच्या होतात. या सवयींमुळे पाठीच्या कण्यावर अतिरिक्‍त दाब येण्यास सुरवात होते.

पाठीच्या कण्यातून सर्व अवयवांना संवेदना पोहोचवणाऱ्या नसांवर जर हा अतिरिक्‍त दाब पडला तर त्या अव्यवयांच्या कार्यात काहीना काही बाधा येण्यास सुरुवात होते. हीच स्थिति मनाचीही होते. सतत अनामिक ओझ्याखाली, तणावाखाली राहण्याची प्रथम सवय करून घेतली जाते. परंतु जेव्हा एखादी मनाविरुद्ध घटना घडली तर मात्र त्याचा उद्रेक होऊन मनाची चलबिचलता, अस्थिरता वाढत जाते. यामुळे मनाचे संतुलन बिघडते.

ही स्थिती प्रत्येक वयोगटातील व्यक्‍तींना लागू होते. शाळकरी मुलेही यातून सुटू शकत नाहीत. म्हणूनच विशीच्या तरुणांमध्ये देखील मणक्‍याचा त्रास सुरू झाल्याचे आढळून येते.
आजचा आहार आणि कामाचे स्वरूप यांचा ताळमेळ बसणे खूप अवघड होत आहे. परिणामी पोटाच्या निरनिराळ्या तक्रारी वारंवार दिसून येतात. म्हणजेच मनावरचा ताण हा पोटाच्या आजारांना देखील कारणीभूत असतो.

त्यानंतर मानेचा म्हणजेच सर्व्हायकल स्पॉंडीलोसिस, कमरेचा लंबर स्पॉंडीलोसिस, ऍन्कलोजिंग स्पॉंडीलोसिस, स्लिप डिस्क, पीआयडी, फ्रोझन शोल्डर, अर्थ्रायटिस, सायटिका, व्हेरिकोज व्हेन्स, हातापायाला मुंग्या येणे, हातापायांची जळजळ होणे, हातापायात शक्‍ती नाही असे वाटणे, चालताना, जीने चढता उतरता पाय भरून येणे, उठता बसत गुडघे दुखणे, कटकट आवाज येणे, मांडी घालून बसता न येणे याप्रकारच्या तत्सम तक्रारी उद्‌भवतात.

काही व्यक्‍तींमध्ये पचनाच्या तक्रारी, ऍसिडिटी, कोलायटिस, आय्‌ बी एस्‌ तर महिलांमध्ये पाळीच्या तक्रारी, पिसीओडी तर काहींना ऍलर्जीची सर्दी, सायनस, डोकेदुखी, मायग्रेन या तक्रारी सुरू होतात. वयोमानानुसार किंवा अनुवंशिकतेमुळे रक्‍तदाब अर्थात बीपी किंवा मधुमेह म्हणजेच डायबेटीस वगैरे आजार कायमचे मागे लागतात.

अशा तक्रारींकरीता बहुतांशी व्यक्‍तींच्या सवयी कारणीभूत असतात तर काही वेळा जंतू संसर्ग किंवा अपघाताने अगर मार लागल्यानेही त्रास सुरू होऊ शकतो. म्हणजेच आपल्या बऱ्याच तक्रारींचा उगम हा आपल्या सवयींमध्ये दडला आहे. कारण या सवयी आपले शरीर गुरुत्वमध्यात ताठ राहण्यासाठी मदत करतात. शरीराचा प्रत्येक अवयव, प्रत्येक स्नायू, प्रत्येक रचना सुरळीत आणि सुयोग्य पद्धतीत काम करू शकतात.

यामुळे शरीराची प्रतिकरशक्‍ती चांगली राहते. या सवयींच्या चाकावर आपल्या शरीराची गाडी सुरळीत चालते. यापैकी एक चाकाची अलाईनमेंट नकळत बिघडली तर एक एक तक्रार उद्‌भवणे सुरू होते. शरीराचा गुरुत्त्वमध्य ढासळून शरीरातील चरबी (फॅट) ठीकठिकाणी साठू लागते. सांधे, हाडे आणि पाठीच्या मणक्‍यात दोष निर्माण होऊ लागतात.

बऱ्याच वेळा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपण शरीर ओढत राहतो. मात्र एक दिवस एखादे निमित्त होते आणि शरीराला आजाराचे लेबल लागते. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी निश्‍चितपणे वैद्यकीय क्षेत्रात अतिशय सोपे असे उपाय आहेत. या संबंधात दैनिक प्रभातच्या वाचकांसाठी सविस्तर माहिती पुढील लेखात घेऊया.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.