पारनेर – नगर- पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, रविवारी (दि. 21) सुपा येथे टेम्पो व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात सुपा येथील हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब पवार यांचे निधन झाले.
याबाबत सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या आसपास एक मालवाहतूक टेम्पो सुपा-नगर रोडवरील दौलत पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलांडत असताना त्याच वेळी सुपा येथील संदीप उद्योगसमूहाचे बाळासाहेब पवार हे पवारवाडीकडून त्यांच्या संदीप हॉटेलवर येत असताना टेम्पो व मोटारसायकल यांची धडक झाली. यात बाळासाहेब पवार गंभीर जखमी झाले.
त्यांना तेथील स्थानिक व्यावसायिक, रहिवाशांनी ताबडतोब सुपा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु परिस्थिती थोडी गंभीर वाटल्याने त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी पाचच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. रात्री उशिरा त्यांच्यावर पवारवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
बायपास किंवा उड्डाणपुलाची आवश्यकता
दरम्यान, नगर-पुणे महामार्गावर गेल्या पंधरा दिवसांपासून अपघातांत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सुमारे पंधरा ते वीस गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा शहरात वाढती लोकसंख्या पाहता बायपास किंवा उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. नगर- पुणे महामार्गावर मरण झाले स्वस्त असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.यावर प्रशासन काय उपाययोजना करते हे महत्त्वाचे आहे.