नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या पोलीस कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ झाली आहे. त्याला आज पारनेर न्यायालयात प्रथम वर्ग दंडाधिकारी उमा बोराडे यांच्या समोर हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. बोठेच्या कोठडीत तिसर्यांदा वाढ झाली आहे.
दरम्यान, संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने पहिले आठ दिवस रेल्वे स्टेशनवर मुक्काम केल्याचे समजते. तशी माहिती त्याने तपासी अधिकार्यांना दिली आहे. मात्र, या काळात त्याला कोणी मदत केली? याचा तपास आता पोलीस पथक करत आहे.
रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे रस्त्यावरील पारनेर तालुक्याच्या हद्दीतील जातेगाव घाटात दोघा जणांनी गळा चिरून हत्या केली होती. त्यातील पाच संशयित आरोपींना जेरबंद करण्यात पोलीस अधिकार्यांना तत्काळ यश आले. मात्र, घटनेमागील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे अनेक दिवस पोलीसांना सापडत नव्हता. अखेरीस पोलिसांनी त्याला हैदराबाद येथील बिलालनगर परिसरातून अटक केली.
त्यास पारनेर न्यायालयात हजर केले होते. त्यास पहिल्यांदा सात दिवसांची, नंतर तीन दिवसांची व आता तिसर्यांदा दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने मंजूर केली आहे. आरोपी बोठेकडे हत्येसंदर्भात अजूनही काही चौकशी करायची आहे. या कटात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. तसेच आरोपी गुन्हा घडल्यापासून नगरमध्ये कोठे होता, त्याचा तपास करणे आहे.
आरोपीस नगर येथून हैदराबाद येथे जाण्यास कोणी व कशाप्रकारे मदत केली. मदत करणारी फरार आरोपी पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचरीने कशी व कोणत्याप्रकारे मदत केली. बोठे याने घटनेबाबत अजून कोणाला सुपारी दिली होती का? व दिली असेल तर त्याबाबत तपास करणे बाकी असून, बोठे याला पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी आज केला.
दरम्यान, संशयित आरोपी बोठे याने पोलिसांना तपासात सहकार्य केले आहे. आजपर्यत म्हणजे 12 दिवसांपासून आरोपी पोलीस कोठडीत आहे. या दिवसांत आरोपीने पोलिसांस त्याच्याकडे असणारी संपूर्ण माहिती दिलेली आहे, असा युक्तीवाद करत त्यास पुन्हा पोलीस कोठडीची गरज नसल्याची भूमिका आरोपीच्या वकिलांनी मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर बोठेला गुरुवारपर्यंत (दि.22) पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.