पुणे(प्रतिनिधी) – लहान मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे दोन वर्षांहून अधिककाळ तुरुंगात असलेल्याला उच्च न्यायालयाने 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. सत्र न्यायालयाच्या शिक्षेच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. हे अपील जलदगतीने चालविण्याचा आदेश मार्च 2019 मध्ये झाला होता. मात्र, वर्षभरात काही प्रगती झाली नाही. तसेच, करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आता अपील जलदगतीने चालविणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर हा निकाल झाला.
दत्तात्रय ऊर्फ दत्ता राजेंद्र मोरे असे त्याचे नाव आहे. त्याने अॅड. सुनीता बन्सल, अॅड. नितीश चोरबेले आणि अॅड. विक्रांत सुतारिया यांच्यामार्फ उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. 2016 मध्ये ही घटना घडली.
18 मार्च ते 13 एप्रिल 2016 या कालावधीत तो न्यायालयीन कोठडीत होता. खटल्याची सुनावणी सुरू असताना त्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर 25 जानेवारी 2018 रोजी बाललैंगिक प्रकरण चालविणाऱ्या विशेष न्यायालयाने त्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तेव्हापासून तो कारागृहात आहे. या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते. त्यानंतर जामिनासाठी अॅड. सुनीता बन्सल, अॅड. नितीश चोरबेले आणि अॅड. विक्रांत सुतारीया यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला.
गुन्हा झालाय, त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जायचे नाही. ज्याठिकाणी नातेवाईकांकडे राहणार आहे. त्याचा पत्ता विशेष न्यायालय आणि दत्तवाडी पोलीस स्टेशनला देण्यात यावा, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.