नवी दिल्ली : देशासमोर उभ्या असलेल्या कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक पुढे सरसावले आहेत तर याचबरोबरीने सिने कलाकारांनीसुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील सिनेमांचे शुटिंग बंद आहे. त्यामुळे सिनेतंत्रज्ञ आणि सहकलाकारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॉलीवूडप्रमाणेच दक्षिण भारतातील सिनेसृष्टीतही या सहकलाकार आणि तंत्रज्ञांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी या सर्व सहकलाकारांच्या उपजीविकेची काळजी लक्षात घेऊन रजनीकांत यांनी 50 लाख रुपयांची देणगी दिली आहे. तर बाहुबली प्रभासने दाक्षिणात्य कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभासने ४ कोटी रुपयांपैकी ३ कोटी रुपये पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीच्या माध्यमातून दिले आहेत. तर उर्वरित ५०-५० लाख रुपये अनुक्रमे आंध्र प्रदेश आणि तेलंगना राज्याच्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी दिले आहेत. दरम्यान, प्रभासप्रमाणेच दाक्षिणात्य कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे. पवन कल्याण, रामचरण,चिरंजीवी, महेश बाबू या कलाकारांनी आर्थिक मदत केली आहे. पवन कल्याण यांनी २ कोटी रुपये मदतनिधी म्हणून दिले असून महेश बाबूने १ कोटी रुपयांची मदत केली आहे.