बाबासाहेब पुरंदरे यांनीदेखील मतदानाचा हक्‍क बजावला

मुंबई : राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. दरम्यान सर्वसामान्यांसह अनेक नेतेमंडळी आणि सेलिब्रेटीही मतदानासाठी बाहेर पडले आहेत. पुण्यातील पर्वती येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. वयाच्या 97 व्या वर्षीही बाबासाहेब पुरंदरे यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपले कर्तव्य पार पाडले

लोकांना बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. मतदान करणे आपले कर्तव्य आहे. याच भावनेने मी आलो आहे. कोणीही माझ्याकडे मतदानासाठी चला म्हणून हट्ट धरला नाही, किंवा जबरदस्ती गाडीत बसवलेले नाही. तसेच कोणीही पैसेदेखील दिलेले नाहीत. मतदान करणे एक प्रकारचा आनंद असतो, यावेळी त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रासाठी तुमचे काय व्हिजन आहे असे विचारले असता बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले की, पुढचे पाऊल पुढेच पडले पाहिजे मग ते कोणतेही क्षेत्र असो. आपण मागे राहता कामा नये. आपण नेहमी पुढे चालत राहिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच मेरा भारत महान ट्रकपुरते राहू नये, हे संपूर्ण देशासाठी लागू असे पाहिजे असेही त्यांनी सांगितले. राज्य विधानसभेच्या जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.