नाशिक – शिवसेनेचे उपनेते व २५ वर्ष आमदार राहिलेले बबनराव घोलप यांनी अखेर आज सकाळी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत शिवसेनेला (ठाकरे गट) जय महाराष्ट्र केला. गेल्या अनेक दिवसापासून घोलप हे शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मात्र अद्याप त्यांनी कुठल्या पक्षात जाणार हे जाहीर केलेले नाही.
घोलप यांनी सांगितले की, मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे. कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणुन मी निष्ठेने व ईमाने ईतबारे काम केले आहे. मला पक्षाने जे जे सांगितले, ते प्रामाणीकपणे केले आहे. पण अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदावरुन वरुन मला काढुन मला अपमानीत करण्यात आले. मी ज्यांना निष्क्रीय पदाधीकारी म्हणून काढुन टाकले होते व नविन पदाधिकारी नेमले होते. त्यांनाही बदलण्यात आले, हे कितपत बरे आहे.
शिवसेना उपनेते, मनोहर जोशी मंत्रिमंडळात समाजकल्याण मंत्री आणि पाच वेळा देवळाली मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांचा एकत्रित शिवसेना विस्तारित करण्यात महत्त्वाचा वाटा राहिला आहे. प्रशांत हिरे, उत्तमराव ढिकले, माणिकराव कोकाटे आदी मूळ काँग्रेस संस्कृतीतील बड्या नेत्यांना शिवसेनेत आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
तथापि, गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्हा शिवसेनेतील गट-तटाच्या राजकारणात त्यांचे नेतृत्व दुर्लक्षित झाले. काही महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये त्यांना डावलण्यात आले. याचा परिणाम त्यांनी स्वत:हून पक्षीय बैठकांना येणे टाळण्याचे धोरण स्वीकारले. ही परिस्थिती लक्षात घेता त्यांनी ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटावयास नको, अशी भावना त्यांचे समर्थक व्यक्त करताना दिसत आहेत.