- वरसोली टोलनाका येथील घटना; मुलगी गंभीर जखमी
लोणावळा – जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाका येथे दुचाकीला भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने जोरात धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील बाप-लेकांचा कंटेनरखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला. तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी ( दि. 21) सकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे.
रामकेवल रामेश्वर पूर्वी (वय 39), धीरज रामकेवल पूर्वी (वय 13) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बाप-लेकांची नावे आहेत. तर सुधा रामकेवल पूर्वी (वय 15) ही गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी कंटेनर चालक सुरेश मंगल राम (वय 22, रा. बाडनेर, राज्यस्थान) याला अटक करण्यात आली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकेवल हे त्यांचा मुलगा धीरज व मुलगी सुधा असे तिघे त्यांच्या दुचाकीवरून (एम.एच. 12 /जे.डी./926) मुंबईच्या दिशेने जात होते. यादरम्यान दुचाकीच्या मागून आलेल्या भरधाव कंटेनरची (आर.जे.04/जीबी/7001) दुचाकीला धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील तिघेही जोरात रस्त्यावर आदळले. त्यानंतर कंटेनर रामकेवल व धीरज यांच्या अंगावरून गेल्याने त्या दोघांचा जागीच मृत्यू तर सुदैवाने सुधा बाजुला पडल्याने ती या दुर्घटनेतून वाचली; मात्र ती गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात वरसोली टोलनाक्यावर घडल्याने अपघातानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी कंटेनर चालकाला पकडले आणि या अपघाताची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना दिली.
वरसोली टोलनाका येथील कर्मचारी रुपेश शिवाजी मोरे (वय 34, रा. विठ्ठलवाडी, कल्याण) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक निलेश माने तपास करीत आहेत.