नगर – शहरातील हुंडेकरी उद्योगसमूहाचे संचालक व उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांना पिस्तुलाच धाक दाखवून 25 लाखांच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण करण्यात आले होते. वेळीच पोलिसांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली. व त्यातील दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहेत. मात्र, मुख्य आरोपी अद्यापही मोकाट असल्याने हुंडेकरी हे धास्तावलेच असल्याचे दिसत आहे.
हुंडेकरी व त्यांचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांची भेट घेतली. अपहरण प्रकरणी मुख्य आरोपी हा अद्याप मोकाट असल्याने पोलीस प्रशासनाने त्याला गजाआड करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. हुंडेकरी यांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केल्यामुळे हुंडेकरी यांच्या शिष्टमंडळांनी पोलीस अधीक्षक सिंधू यांचा सत्कार केला. तसेच हुंडेकरी यांना व त्यांच्या परिवाराला धोका असल्याने लवकरात लवकर मुख्य आरोपीला अटक करावी, अशीही मागणी केली.
हुंडेकरी उद्योगसमूहाचे संचालक करीमभाई हुंडेकरी यांचे सोमवारी (दि.18) रोजी पहाटे पाचच्या सुमारास फकीर गल्ली येथून पिस्तुलाच धाक दाखवून अपहरण करण्यात आले होते. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत आरोपींचा पाठलाग सुरु केला होता. त्यामुळे आरोपींनी हुंडेकरी यांना जालना येथे सोडून दिले होते. मात्र, हुंडेकरी यांचे अपहरण कोणी व कशासाठी केले? याबाबत पोलिसांनी मौन पाळले होते. आरोपींनी 25 लाख रुपये देण्याच्या बोलीवर हुंडेकरी यांना सोडले असल्याचे समजते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अपहरण करणाऱ्या दोघांना जालना येथून ताब्यात घेतले आहे.