नाशिक – लाऊडस्पीकरच्या वादातून नाशिक प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा किंवा भजन वाजवण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले की, अजानच्या आधी आणि नंतर 15 मिनिटांत परवानगी दिली जाणार नाही. इतकेच नाही तर मशिदीच्या 100 मीटरच्या आत हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर वाजवण्यास परवानगी नाही.
कायदा व सुव्यवस्था राखणे हा या आदेशामागचा उद्देश असल्याचे नाशिक आयुक्तांनी सांगितले. ते म्हणाले की, सर्व धार्मिक स्थळांना 3 मे पर्यंत लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 3 मे नंतर आदेशाचे कोणी उल्लंघन करताना आढळून आल्यास, उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
राज्यभरात लाऊडस्पीकरवर परवानगी देण्याची तयारी –
महाराष्ट्रातील लाऊडस्पीकरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. आता राज्यातील पोलिसांच्या परवानगीनंतरच धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर करण्यास परवानगी दिली जाणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज डीजीपी आणि पोलिस आयुक्तांची बैठक घेणार आहेत. यासंदर्भात ते मार्गदर्शक तत्त्वे जारी करतील, असे मानले जात आहे. याशिवाय राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणि सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरचा वापर याबाबतही ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
ठाकरे यांनी दिला अल्टिमेटम –
महाराष्ट्रात सध्या लाऊडस्पीकर वादाचे पडसाद उमटले आहेत. मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्यासाठी मनसेकडून सातत्याने आंदोलन सुरू आहे. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील सभेत भाषण करताना मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली होती. 3 मे पर्यंत राज्य सरकारने या प्रश्नावर कारवाई केली नाही तर मशिदीबाहेर ध्वनीक्षेपक लावून हनुमान चालीसा पूर्ण आवाजात वाजवू, असा इशारा त्यांनी दिला होता. तेव्हापासून राज्यात जातीय तणाव निर्माण होण्याची भीती अधिक गडद होत आहे.