बंगळुरू – कर्नाटकातील मंगळुरू येथे रविवारी रात्री एक मोठा अपघात झाला. फिश प्रोसेसिंग युनिटमध्ये गुदमरल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे. मंगळुरूचे पोलिस आयुक्त एन शशी कुमार यांनी ही माहिती दिली आहे. सर्व मजूर पश्चिम बंगालचे रहिवासी होते. मृताचे वय 20 ते 22 वर्षे दरम्यान आहे.
पोलीस आयुक्तांनी सांगितले की, एक कामगार कचरा साठवण्याच्या टाकीच्या आत पडला आणि त्यातच बेशुद्ध पडला. त्याला वाचवण्यासाठी इतर सात मजूर टाकीत शिरले आणि तेही बेशुद्ध झाले. त्यांना एजे रुग्णालयात नेण्यात आले, तेथे काल रात्री तिघांचा मृत्यू झाला. आज सकाळी आणखी दोघांचा आयसीयूमध्ये मृत्यू झाला. हे सर्व मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी असून त्यांचे वय 20 ते 22 वर्षांच्या दरम्यान आहे. आयसीयूमध्ये असलेल्या इतर तिघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
दरम्यान या प्रकरणी व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रॉडक्शन मॅनेजर रुबी जोसेफ, फील्ड मॅनेजर कुबेर गाडे आणि पर्यवेक्षक मोहम्मद अन्वर आणि फारुक यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.