नवी दिल्ली : दिल्लीतील ऑटो, टॅक्सी आणि मिनीबस चालकांच्या विविध संघटनांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे.
विविध संघटना भाडेवाढ आणि सीएनजीचे दर कमी करण्याची मागणी करत आहेत. बहुतेक संघटनांनी सांगितले की, ते एक दिवसीय संपावर जातील. परंतु सर्वोदय ड्रायव्हर असोसिएशन दिल्लीने सांगितले की ते आजपासून “अनिश्चित काळासाठी” संपावर जाणार आहेत.
दिल्ली सरकारने कालबद्ध पद्धतीने भाडेवाढीचा विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करूनही संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वोदय ड्रायव्हर असोसिएशन दिल्लीचे अध्यक्ष कमलजीत गिल म्हणाले, “सरकार इंधन दर कमी करून आणि भाडे वाढ करून आम्हाला मदत करण्यासाठी कोणतीही पावले उचलत नसल्याने आम्ही सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली ऑटो रिक्षा असोसिएशनचे सरचिटणीस राजेंद्र सोनी म्हणाले, “आम्हाला माहित आहे की दिल्ली सरकार एक समिती स्थापन करत आहे. परंतु आम्हाला आमच्या समस्यांवर उपाय हवा आहे. सरकारने (केंद्र आणि दिल्ली) CNG किमतीवर 35 रुपये प्रति किलो सबसिडी द्यावी, अशी आमची मागणी असल्याचं सोनी यांनी म्हटलं.