Ayodhya Ram Mandir: अयोध्येच्या राम मंदिरात सोमवारी राम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमादरम्यान एका भक्ताला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या पथकाने त्याला वेळीच गर्दीतून बाहेर काढून वाचवले.
रामकृष्ण श्रीवास्तव (वय ६५) असे या व्यक्तीचे नाव असून मंदिराच्या आवारात त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर विंग कमांडर मनीष गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील भीष्म क्यूबच्या पथकाने घटनेच्या एका मिनिटात त्यांना बाहेर काढले आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
उपचारादरम्यान, असे आढळून आले की श्रीवास्तव यांच्या रक्तदाबाची पातळी धोकादायक पातळीवर वाढली आहे. रॅपिड रिस्पॉन्स टीमने त्यांच्यावर प्रथमोपचार केले. निवेदनानुसार, रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना पुढील निरीक्षणासाठी आणि विशेष काळजी घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. आता रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. कोणताही धोका नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात श्री रामललाच्या नवीन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाला. हा सोहळा देश-विदेशातील लाखो राम भक्तांनी पाहिला. प्राणप्रतिष्ठा प्रसंगी लष्कराच्या हेलिकॉप्टरने नव्याने बांधलेल्या रामजन्मभूमी मंदिरावर पुष्पवृष्टी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘X’ वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अयोध्या धाममध्ये श्री राम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा अलौकिक क्षण सर्वांना भावूक करणारा आहे. या दैवी कार्यक्रमाचा एक भाग होणे मला खूप आनंददायी आहे. जय सियाराम!”