टेलिमेडिकलवर भर द्या; इंडियन मेडिकल असोसिएशनचे आवाहन
पुणे – राज्य सरकारने खासगी डॉक्टरांना त्यांचे दवाखाने, क्लिनिक सुरू करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु करोनामुळे सतर्कता म्हणून तपासणी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे दवाखान्यांतही नागरिकांनी गर्दी करू नये, आवश्यक असेल तरच दवाखान्यात जावे, अन्यथा फोनवरूनच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी केले आहे.
शहरात अंदाजे 13 हजार खासगी दवाखाने आणि 4 हजार 800 आयएमए सभासद आहेत. शहराची 85% आरोग्य सेवेची जबाबदारी खासगी दवाखाने व रुग्णालय सांभाळतात. दिवसभरात लाखो लोक या सेवेचा लाभ घेतात. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर यातील काही दवाखाने बंद आहेत किंवा अंशत: कार्यरत आहेत.
पुण्यातील बहुतेक डॉक्टर्स सध्या ऑडिओ, व्हिडीओच्या माध्यमातून रुग्णांना आवश्यक ती सेवा व सूचना देऊ शकतात. त्यामुळे निश्चितच दवाखान्यातील गर्दी कमी होते; परंतु सर्व दवाखाने सक्तीने उघडे ठेवण्याचे शासकीय आदेशाबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण करणारे आहे. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची गर्दी ही रोगाचा प्रसार वाढवू शकते.
करोना बाधित रुग्णांकडून डॉक्टरांकडे व नंतर डॉक्टरांकडून इतर निरोगी रुग्णांकडे संक्रमण होण्याची शक्यता यामुळे खूपच वाढेल, अशा परिस्थितीत दवाखान्यांमधील गर्दीमुळे संसर्ग झाल्यास व पुणे शहरात करोनाचा प्रादुर्भाव अधिक वेगाने झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.
इमर्जन्सी असेल तरच यावे…
इमर्जन्सी असल्याशिवाय दवाखान्यात जाणे टाळावे. सध्या, रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, असे डॉ. संजय पाटील, डॉ. पद्मा अय्यर, नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ. आरती निमकर, सचिव डॉ. राजू वरयानी, डॉ. राजन संचेती यांनी केले आहे.