मेलर्बन – जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ॲश्ले बार्टीने आज एक नवीन इतिहास आपल्या नावावर केला आहे. बार्टीने अंतिम फेरीत अमेरिकेच्या डॅनियला कॉलिन्सचा सरळ सेटमध्ये पराभव करून तिसरे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद पटकावले.
रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या या अंतिम फेरीत बार्टीने कॉलिन्सचा 6-3, 7-6(2) असा पराभव करून पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. यासोबतच 44 वर्षांनंतर महिला एकेरीचे ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद जिंकणारी ती पहिली ऑस्ट्रेलियन महिला ठरली आहे. यापूर्वी ख्रिस ओ’नीलने 1978मध्ये शेवटचे विजेतेपद पटकावले होते.
ऑस्ट्रेलियन खेळाडू बार्टीने सुरूवातीपासूनच सामन्यात आपला दबदबा ठेवला होता. त्यामुळेच पहिला सेट हा 6-3 अशा फरकाने आपल्या नावे केला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये अमेरिकन खेळाडूने पुन्हा एकदा सेटमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पण दुसरा सेटदेखील 7-6(2)ने गमवावा लागला. सलग दुसरा सेट जिंकत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकत तिसरा ग्रॅंडस्लॅम जिंकण्याचा विक्रम ऍश्लेने आपल्या नावे केला.
राफाला विक्रमाची संधी
स्पेनच्या राफेल नदालने चमकदार कामगिरी कायम ठेवत सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. नदाल आता 21वे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद मिळवण्यापासून केवळ एक मार्ग दूर आहे. अंतिम फेरीत नदालचा सामना रविवारी डॅनिल मेदवेदेवशी होणार आहे. हा सामना नदालने जिंकल्यास 21 ग्रॅंड स्लॅम जेतेपद पटकावणारा तो पहिला पुरुष टेनिसपटू ठरेल. नदालने फायनल जिंकल्यास तो सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला मागे टाकून त्याचे 21वे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद पटकावेल. यासह चारही ग्रॅंडस्लॅम किमान दोनदा जिंकणारा तो दुसरा पुरुष खेळाडू ठरेल.
हा अंतिम सामना अनेक अर्थांनी खास होता. कारण, दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. बार्टीची ही केवळ तिसरी अंतिम फेरी होती, तर कॉलिन्स पहिल्यांदाच ग्रॅंडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. कॉलिन्सने प्रथमच ग्रॅंडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे आगेकूच केली होती. मात्र, तिच्या या चमकदार प्रवासाचे अंतिम फेरीत विजेतेपदात रुपांतर झाले नाही. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक स्टार बार्टीसमोर तिचे विजेतेपदाचे स्वप्न अधुरेच राहिले.
ॲश्ले बार्टीचे हे तिसरे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद ठरले आहे. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या बार्टीने 2019मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर बार्टीला पुढील विजेतेपदासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागली. गेल्या वर्षी 2021मध्ये विम्बल्डनच्या अंतिम फेरीत कॅरोलिना प्लिस्कोव्हाला पराभूत करून तिने दुसरे ग्रॅंडस्लॅम जिंकले होते.